लसींचा अर्धा साठा गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:51 IST2021-04-30T04:51:11+5:302021-04-30T04:51:11+5:30
ठाणे : लसीच्या मर्यादित पुरवठ्यामुळे एकीकडे ठाणे महापालिकेला लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत असताना दुसरीकडे घोडबंदर येथील एका लसीकरण ...

लसींचा अर्धा साठा गायब
ठाणे : लसीच्या मर्यादित पुरवठ्यामुळे एकीकडे ठाणे महापालिकेला लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत असताना दुसरीकडे घोडबंदर येथील एका लसीकरण केंद्रावर लसीचा अर्धा साठा गायब केला जात असल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उघड झाली. हा सर्व प्रकार शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा यांच्यासमोर घडला. या केंद्रावर असलेल्या २०० लसपैकी १०० लस डॉक्टरांनी गायब केल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली. हा साठा दोन नगरसेवक घेऊन गेल्याचे खोटे उत्तर या डॉक्टरांनी दिले. लसीचा काळाबाजार होत असल्याची शंका उपस्थित करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून डॉक्टरांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.
रेमडीसिविरबरोबर लसींचादेखील मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून लसीकरण केंद्रांवर लांब रांगा लागत आहेत. अनेकदा लसींअभावी केंद्रच बंद ठेवण्यात येत असून यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या गंभीर परिस्थितीकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधत, मणेरा यांनी घोडबंदर येथील लसीकरण केंद्रावर गैरकारभार सुरु असल्याची माहिती त्यांनी स्थायी समितीला दिली. या केंद्रावर २०० लस उपलब्ध होत्या. मात्र डॉक्टरांनी केवळ १०० लोकांनाच लस दिली. उर्वरित १०० लसींबाबत मणेरा यांनी विचारणा केली असताना दोन नगरसेवकांकडे या लस उपलब्ध असल्याचे उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले. मात्र त्या नगरसेवकांना विचारणा केल्यानंतर असा काही प्रकार झालाच नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर १५० लोकांचे लसीकरण केल्याचे उत्तर देऊन या डॉक्टरांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. या दोन ते तीन दिवसांत १०० लसीचा साठा गायब असल्याचा आरोप मणेरा यांनी केला असून या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी या दोन्ही डॉक्टरांना त्यांच्या दालनात बैठक झाल्यानंतर बोलावण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.