दुर्गाडी पुलावरील दोन लेनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST2021-06-01T04:30:25+5:302021-06-01T04:30:25+5:30
कल्याण : दुर्गाडी खाडीपुलाच्या दोन लेनचे ऑनलाइन लोकार्पण सोमवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सायंकाळी ५ ...

दुर्गाडी पुलावरील दोन लेनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
कल्याण : दुर्गाडी खाडीपुलाच्या दोन लेनचे ऑनलाइन लोकार्पण सोमवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी फीत कापून दोन लेनचे उद्घाटन केले. त्यानंतर या लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली. त्यावेळी सगळ्य़ांनी एकच जल्लोष केला. मात्र, कार्यक्रमानिमित्त शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. पालकमंत्र्यांनी आवाहन करूनही गर्दी कमी होत नव्हती.
पुलाच्या ऑनलाइन लोकापर्णापूर्वीच शिवसेना-भाजप आणि मनसे यांच्यात श्रेयवाद रंगला होता. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता. तेथे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर तळ ठोकून होते. सायंकाळी पालकमंत्र्यांनी पुलाच्या दोन लेनच्या कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी आकाशात भगवे फुगे सोडून आनंद व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजपचे खासदार कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले की, जुना अस्तित्वात असलेला दोन लेनचा पूल हा वाहतुकीसाठी कमी पडत होता. तेथे वाहतूककोंडी होत होती. या कोंडीतून सुटका करण्यासाठी सहा पदरी खाडीपुलाची उभारणी केली जात आहे. त्यापैकी आज दोन लेन पूर्णत्वास आल्याने त्या वाहतुकीसाठी खुल्या गेल्या आहेत. जुन्या पुलाच्या दोन लेन आणि आता खुल्या केलेल्या नव्या पुलाच्या दोन लेन मिळून चार लेन उपलब्ध झालेल्या आहेत. नव्या पुलाच्या उर्वरित चार लेनचे काम लवकर पूर्ण होणार आहे. हे काम पूर्णत्वास आल्यावर वाहतुकीसाठी आठ लेन उपलब्ध होणार आहे.
-----------------