ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये मतदारराजाने दिला संमिश्र काैल, रायगडमध्ये महाविकास आघाडीची मुसंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 07:13 IST2021-01-19T07:13:36+5:302021-01-19T07:13:41+5:30
जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल साेमवारी जाहीर झाला. भिवंडी तालुक्यात झालेल्या ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने ३० जागा जिंकल्याचा, तर शिवसेनेने २० जागा जिंकल्याचा दावा केला आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये मतदारराजाने दिला संमिश्र काैल, रायगडमध्ये महाविकास आघाडीची मुसंडी
ठाणे : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या आज जाहीर झालेल्या निकालात संमिश्र काैल मिळाला आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. दाेन्ही पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला असला तरी सरपंचांच्या निवडणुकीनंतरच खरे चित्र स्पष्ट हाेणार आहे.
जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल साेमवारी जाहीर झाला. भिवंडी तालुक्यात झालेल्या ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने ३० जागा जिंकल्याचा, तर शिवसेनेने २० जागा जिंकल्याचा दावा केला आहे. तर तीन ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या हाेत्या. भिवंडीत ५० वर्षांची सत्ता पालटवून भाजपने सर्व १७ उमेदवार निवडून आणले आहेत. शहापूर तालुक्यात झालेल्या ४४ ग्रामपंचायतींपैकी ३७ ग्रामपंचायतींवर भाजपने, तर शिवसेनेने ३१ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्याचा दावा केला. विशेष म्हणजे पाच ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या हाेत्या. त्यामुळे खरे सत्ताधारी हे सरपंचांच्या निवडणुकीनंतरच ठरणार आहेत. शहापूरमध्ये झालेल्या पाच ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीने तीन, तर शिवसेनेने चार ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.
अंबरनाथ तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींपैकी ११ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व असून भाजप आठ जागांवर राष्ट्रवादी ४ जागांवर, मनसे एक जागेवर तर महाविकास आघाडी तीन जागांवर विजयी झाली आहे. अंबरनाथमधील काकाेळे ग्रामपंचायतीत मनसेने शिवसेनेला धूळ चारत बाजी मारली.
पालघरमध्ये स्थानिक आघाडीची बाजी -
- जिल्ह्यातील दोन तालुक्यांतील तीन ग्रामपंचायतींच्या पार पडलेल्या निवडणुकांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला निर्विवाद वर्चस्व गाजवता आलेले नाही. मात्र शिवसेना एक, बहुजन विकास आघाडी एक आणि एका ठिकाणी स्थानिक आघाडीने बाजी मारली आहे.
- पालघर तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीत शिवसेनेने बाजी मारली आहे, तर वसई तालुक्यातील पाली ग्रामपंचायतीमध्ये बविआचे वर्चस्व राहिले आहे. तर वसईतील सत्पाळ्यात ग्रामसमृद्धी पॅनेलने अन्य पक्षांवर मात करीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फारसे समाधाकारक यश मिळवता आलेले नाही.
- पालघरमधील सागावे येथे शिवसेनापुरस्कृत युवा परिवर्तन पॅनलने ७ पैकी ४ जागांवर वर्चस्व मिळवीत भगवा फडकवला. तर विरोधी युवा परिवर्तन पॅनलला ३ जागांवर समाधान मानावे लागले.
- सत्पाळा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसमृद्धी पॅनेलने ११ जागांपैकी ९ जागा जिंकत बाजी मारली असून, यामध्ये बहुजन विकास आघाडीला दोन जागांवरच समाधान मानावे लागले आहे.
- तर पालीत मात्र बहुजन विकास आघाडीची सरशी झाली असून ४ पैकी ३ जागा मिळवल्या आहेत, तर एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे.
रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीचा फाॅर्म्युला चालला -
- रायगड : जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने सर्वाधिक २२ ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केले. राष्ट्रवादी काँग्रेसने १७, शिवसेना १३, शेकाप आणि भाजप प्रत्येकी १२, भाजपा-शिवसेना आघाडी ६, विकास पॅनल ३, काँग्रेस २ आणि एक अपक्ष असे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.
- राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या एकत्रित लढतीचा परिणाम २२ ग्रामपंचायतींच्या निकालावरून स्पष्ट झाला आहे.
- स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे वेगळी असल्याने तेथे साेयीस्करपणे युत्या-आघाड्या करण्यात येतात अथवा ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातूनही निवडणुका लढवल्या जातात. तशीच परिस्थिती रायगड जिल्ह्यातही दिसून आली. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने १७ ग्रामपंचायतींवर निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे.
- शिवसेनेने १३ तर शेकाप आणि भाजपा यांनी प्रत्येकी १२ ग्रामपंचायती खिशात घातल्या आहेत. काँग्रेसला फक्त दाेनच ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करता आले आहे. भाजपा-शिवसेना आघाडीला ६, स्थानिक विकास पॅनल ३ आणि एक अपक्ष असे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.