सोनारांना चुना लावणारी ‘सौ. ४२०’
By Admin | Updated: March 20, 2017 02:07 IST2017-03-20T02:07:56+5:302017-03-20T02:07:56+5:30
सोनारांना चुना लावणाऱ्या महिलेस तिच्या पहिल्या सासूने पकडून बाजारपेठ पोलिसांच्या हवाली केले, तेव्हा तिने दोन पतींच्या घरीही

सोनारांना चुना लावणारी ‘सौ. ४२०’
कल्याण : सोनारांना चुना लावणाऱ्या महिलेस तिच्या पहिल्या सासूने पकडून बाजारपेठ पोलिसांच्या हवाली केले, तेव्हा तिने दोन पतींच्या घरीही हात साफ केल्याची माहिती उघड झाल्याने पोलीसही चक्रावून गेले. मिताली कुलकर्णी असे तिचे नाव असून तिला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तिची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली. तोवर न्यायालयात तिचे दोन पती हजर झाले आणि आमच्या घरी तिने केलेल्या चोरीप्रकरणी न्याय द्या, अशी मागणी त्यांनी न्यायाधीशांकडे केली. तेव्हा तुमचा मामला कौटुंबिक न्यायालयाच्या अखत्यारीतील असल्याने तेथे दाद मागा, असा सल्ला न्यायाधीशांनी त्यांना दिला.
कल्याण पश्चिमेतील टिळक चौकात राहणाऱ्या कुलकर्णी नावाच्या युवकाशी मितालीचा विवाह एप्रिल २०१३ मध्ये झाला. लग्नानंतर काही दिवसांनी ती पतीच्या घरातील दागिन्यावर हात मारुन पसार झाली. तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पण पोलिसांनी तिचा फारसा शोध घेतला नाही, असे त्यांचे म्हणणे होते. मितालीने पुढे डोंबिवलीतील आपटे नामक युवकासोबत विवाह केला. त्याच्याही घरी काही महिन्यांनी हात साफ करुन ती पसार झाली.
तिच्या शोधात तिची पहिली सासू होती. मिताली कल्याणच्या एका सोनाराच्या दुकानात आल्याचे तिला समजले. पहिल्या सासूने तिच्यावर पाळत ठेवली. काँग्रेसच्या माजी नगरसेविका वंदना गीध यांच्या मदतीने काही महिलांना घेऊन सासूने मितालीला पकडून पोलिसांच्या हवाली केले. तेव्हा मितालीने अनेक सोनारांना फसवल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडून दागिने खरेदी करुन त्यांना धनादेश दिले, पण ते वटलेले नाही. अशी तीन सोनारांची फसवणूक केल्याची बाब पोलिसांसमोर आली. पोलिसांनी एका सोनाराच्या तक्रारीच्या आधारे तिला अटक करुन कल्याण न्यायालयात हजर केले, तेव्हा न्यायालयात तिचा पहिला आणि दुसरा पती पोहोचला. त्यांनी आमचीही फसवणूक मितालीने केल्याचे न्यायाधीशांना सांगितले. मात्र न्यायालयाने हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयाच्या कार्यक्षेत्रातील असल्याने तुम्ही त्या न्यायालयात दावा दाखल करुन न्याय मागू शकता, असा सल्ला त्यांना दिला.
मितालीला न्यायालयीन कोठडी मिळाली असून तिची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे. तिने अन्य सोनारांची फसवणूक केली आहे का, याची माहिती तिच्याकडून मिळवली जाणार आहे. (प्रतिनिधी)