कल्याण-डोंबिवली स्मार्ट करण्याचे लक्ष्य
By Admin | Updated: November 11, 2016 02:56 IST2016-11-11T02:56:09+5:302016-11-11T02:56:09+5:30
कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदाचा पदभार वर्षभरापूर्वी हाती घेतला. तेव्हा राजकीय परिस्थिती प्रतिकूल होती. त्यावर मात

कल्याण-डोंबिवली स्मार्ट करण्याचे लक्ष्य
कल्याण : कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदाचा पदभार वर्षभरापूर्वी हाती घेतला. तेव्हा राजकीय परिस्थिती प्रतिकूल होती. त्यावर मात करत मागील वर्षभरात शहरातील नागरिकांच्या हिताची व शहर विकासाची अनेक कामे मार्गी लावली, असा दावा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी गुरुवारी येथे केला.
महापौरपदाच्या वर्षपूर्तीनिमित्त देवळेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सभागृह नेते राजेश मोरे, शिवसेना गटनेते रमेश जाधव, काँग्रेसचे गटनेते नंदू म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
देवळेकर यांनी सांगितले की, ‘महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती नव्हती. महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा सत्तेसाठी युती झाली. त्यामुळे मला महापौरपदाचा मान मिळाला. महापौरपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा महापालिकेत २७ गावांचा समावेश झाला होता. महापालिकेतील एलबीटी कर रद्द झाला होता. महापालिकेस अस्वच्छ शहराचा दर्जा केंद्राच्या समितीने दिला होता. या प्रतिकूल परिस्थितीत महापौरपदाचा कारभार हाती घेतला. महापालिकेचास्मार्ट सिटीच्या यादीत नंबर आणण्यासाठी स्मार्ट सिटीची शिखर परिषद घेतली. महापालिकेचा समावेश स्मार्ट सिटीत झाला आहे. स्मार्ट सिटीच्या कामाला सुरुवात झाली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत स्टेशन परिसर वाहतूकमुक्त केला जाणार आहे. कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा स्कायवॉक लवकर नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सध्या सुरू आहे.’
ते पुढे म्हणाले की, ‘शहराचा खाडीकिनारा सुभोभित करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. हे कामही स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे. कल्याण पश्चिमेत सिटी पार्कचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. त्याचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. शहरातील कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी निविदा मागवली आहे. तिला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच बायोगॅस प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यापैकी दोन प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक धोरण मंजूर करण्यात आले आहे. कल्याण दुर्गाडी सहापदरी पूल आणि मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली हा खाडीपूल मंजूर झाला आहे. त्याचे विकासकाम ‘एमएमआरडीए’तर्फे सुरू केले आहे. ८०० कोटी खर्चाचा रिंगरूट तयार केला जाणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. शहरात मेट्रो रेल्वे व कल्याण-शीळ एलिव्हेटेड रस्ता आणि कल्याण ते मुंबई जलवाहतूक सुरू होणार आहे. कल्याण सर्व वाहतुकीच्या साधनांशी जोडले जाणार आहे. शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी फेरीवाला धोरण ठरवले जाणार आहे. रस्ते विकासाची कामे हाती घेतली आहेत. अर्धवट विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. २४ तास पाणीपुरवठा योजना महापालिकेच्या १० प्रभाग क्षेत्रांपैकी दोन प्रभाग क्षेत्रांत सुरू करण्यात येणार आहे. कल्याणमधील एक व डोंबिवलीतील एक प्रभाग क्षेत्राची २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी निवड केली जाणार आहे. २७ गावांत रस्ते विकास करण्यात येत आहे. नागरिकांना जास्तीतजास्त वेळ दिला आहे.