तृतीयपंथींच्या कलागुणांच्या विकासाकरिता ‘द्या टाळी’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 01:33 IST2019-11-04T01:33:33+5:302019-11-04T01:33:56+5:30
ठाण्यात नव्या व्यासपीठाची उभारणी : रोजगार, कलागुण विकास याकरिता करणार सर्वतोपरी सहकार्य

तृतीयपंथींच्या कलागुणांच्या विकासाकरिता ‘द्या टाळी’ उपक्रम
ठाणे : तृतीयपंथींमधील कलागुणांना वाव देऊन त्यांच्याकरिता व्यासपीठ उभे करण्याचा निर्धार उद्योजिका, देशातील पहिली विवाहित तृतीयपंथीय तसेच, देशातील पहिली तृतीयपंथीय विमा प्रतिनिधी माधुरी सरोदे-शर्मा यांनी रविवारी व्यक्त केला आहे. तृतीयपंथी टाळ्या वाजवून पैसे मागण्याकरिता ओळखले जातात. त्यामुळे ‘द्या टाळी’ हाच ब्रॅण्ड निर्माण केला जाणार आहे. आतापर्यंत समाजासाठी आम्ही टाळ्या वाजविल्या, आता समाजाने आमच्यातील गुण पाहून टाळ्या वाजवाव्या, असे शर्मा म्हणाल्या.
तृतीयपंथींना समाजात सन्मान प्राप्त करून देण्यासाठी तसेच, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक सबलीकरण करण्यासाठी ‘द्या टाळी’ या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन कार्यक्र म ज्येष्ठ उद्योजक मिलिंद जोशी आणि समाजसेवक प्रा.डॉ. सुनील कर्वे यांनी रविवारी तलावपाळी येथील शिवसेना मध्यवर्ती शाखा येथे आयोजित केला होता.
यावेळी माधुरी यांनी तृतीयपंथींच्या आयुष्यावर एक प्रकाशझोत टाकला. त्या म्हणाल्या, मला माझ्या माहेरच्यांनी स्वीकारले नसले, तरी सासरच्यांनी माझा स्वीकार केला. माझे लग्न २०१६ मध्ये एका सामान्य पुरुषाशी झाले. मी देशातील पहिली तृतीयपंथीय आहे, जिने अशा प्रकारचे जाहीरपणे लग्न केले. मी ज्वेलरी डिझाइन करून स्टॉल्स लावले, एलआयसीची परीक्षा देऊन पहिली भारतातील तृतीयपंथीय विमा प्रतिनिधी ठरले. मी नृत्य, अभिनय करते. मी विविध कलांत पारंगत आहे. मग, आम्ही फक्त टाळ्या वाजवून बधाई घेण्यापुरते सीमित आहोत का? आमच्याकडे पण कलाकौशल्य आहे. आम्ही आधी माणूस आहोत मग तृतीयपंथीय. आतापर्यंत समाजासाठी आम्ही टाळ्या वाजवत होतो. आता समाजाने आमच्या अंगी असलेल्या कलेला दाद दिली पाहिजे, टाळ्या वाजविल्या पाहिजेत, अशी आमची इच्छा आहे. देशात तृतीयपंथींसाठी सामाजिक संस्था आहेत. परंतु, आम्हाला संस्था तयार करायची नसून तृतीयपंथींच्या सक्षमीकरणासाठी एक ग्रुप तयार करायचा होता. आता आम्ही ‘द्या टाळी’ या नावाने ग्रुप तयार केला असून सध्या जवळपास १५ ते २० तृतीयपंथी आमच्यासोबत जोडले आहेत, असेही त्या म्हणाल्या.
आज झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी ठराव मांडला की, प्रत्येक तृतीयपंथीकडे कला आहे. त्यात्या कलेची आवड असलेल्या तृतीयपंथीला त्या कलेत पारंगत करावे, जेणेकरून त्यांना त्या कलेच्या माध्यमातून रोजगार मिळवता येईल. मग, त्यांना संगणकाचे प्रशिक्षण द्या, ब्युटीपार्लरचा कोर्स करू द्या अथवा शिवणक्लास करू द्या. कोणताही कोर्स त्यांना मोफत शिकवा. याची सुरुवात ‘द्या टाळी तृतीयपंथीय सक्षमीकरण संघटना’ या माध्यमातून ठाण्यातूनच केली जाणार आहे. सरकारकडे तृतीयपंथींसाठी जो निधी आहे, तो आम्ही सरकारकडे तृतीयपंथींच्या सक्षमीकरणासाठी मागणार आहोत. तसेच, भविष्यात तृतीयपंथींसाठी गृहउद्योग सुरू करायचा असून ‘द्या टाळी’ या ब्रॅण्डअंतर्गत तृतीयपंथींनी तयार केलेल्या फराळापासून सगळ्या वस्तू, खाद्यपदार्थ विकणार आहोत, असेही या कार्यक्रमात ठरविण्यात आले.
यावेळी तृतीयपंथीय अभिनेत्री आणि लावणी नृत्यांगना प्रिया गोसावी, देशातील पहिली तृतीयपंथीय पदवीधर आणि शिक्षिका श्रीदेवी लोंढे, तृतीयपंथीय नृत्यदिग्दर्शिका याना कुलकर्णी व इतर उपस्थित होते. दरम्यान, नूपुर जोशी आणि त्यांच्या संचाने ‘अवघे धरू सुपंथ’ या नाटुकल्याचे सादरीकरण केले.