खड्ड्यांना जबाबदार अधिकाऱ्यांना भारतरत्न पुरस्कार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:46 AM2021-09-24T04:46:50+5:302021-09-24T04:46:50+5:30

कल्याण : पश्चिमेतील भोईर चौक ते उंबर्डे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना कंबरतोड प्रवास करीत मार्गक्रमण ...

Give Bharat Ratna awards to the officers responsible for the pits | खड्ड्यांना जबाबदार अधिकाऱ्यांना भारतरत्न पुरस्कार द्या

खड्ड्यांना जबाबदार अधिकाऱ्यांना भारतरत्न पुरस्कार द्या

Next

कल्याण : पश्चिमेतील भोईर चौक ते उंबर्डे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना कंबरतोड प्रवास करीत मार्गक्रमण करावे लागत आहे. हे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्याची उपरोधिक मागणी कल्याण विकासिनी या सामाजिक संस्थेने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

संस्थेचे अध्यक्ष ॲड. उदय रसाळ यांनी याप्रकरणी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. भोईर चौक ते उंबर्डे या रस्त्यावर चार महिन्यांपासून खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना कंबरतोड प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना मणक्याचे आजार होऊ लागले आहेत. खड्डे बुजविले जात नसल्याने येथून प्रवास करणाऱ्या सहनशील नागरिकांना महापालिकेने उपचारासाठी सानुग्रह अनुदान जाहीर करावे. सातव्या वेतन आयोगानुसार पगार लाटणारे अधिकारी नागरिकांच्या हिताची कामे करण्यास असमर्थ ठरत असतील, तर त्यांचे सानुग्रह अनुदान नागरिकांच्या उपचाराकरिता मिळावे. ज्या तत्परतेने महापालिका प्रशासनाने या रस्त्याचे काम हाती घेतले, तेवढी तत्परता काम पूर्ण करण्यात दाखविली नाही, असे ते म्हणाले.

पैसा नक्की कुठे खर्च केला जातो?

गणेशाचे आगमन खड्डेमय रस्त्यातून झाले. आता नवरात्र येईल. त्यानंतर दिवाळी आहे. यंदा जवळपास १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा पैसा नक्की कुठे खर्च केला जातो. केवळ माती आणि खडी टाकून खड्डे बुजविण्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांच्या खिशात घातला जातो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकारी, कंत्राटदार यांच्या संगनमतापुढे आयुक्तही हतबल झाले आहेत का, असा प्रश्न या संस्थेने केला आहे.

--------------------------

Web Title: Give Bharat Ratna awards to the officers responsible for the pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.