मुलीने उधळला अपहरणाचा डाव
By Admin | Updated: October 22, 2016 03:36 IST2016-10-22T03:36:04+5:302016-10-22T03:36:04+5:30
पेन आणण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घराबाहेर पडलेल्या फरदीन फकीर अहमद शेख (वय १७, रा. पत्रीपूल परिसर) हिचा अपहरणाचा डाव तिला शुद्ध आल्याने फसला.

मुलीने उधळला अपहरणाचा डाव
कल्याण : पेन आणण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घराबाहेर पडलेल्या फरदीन फकीर अहमद शेख (वय १७, रा. पत्रीपूल परिसर) हिचा अपहरणाचा डाव तिला शुद्ध आल्याने फसला. तिने अपहरणकर्त्यांच्या हाताला चावा घेत स्वत:ची सुटका करून घेतली.
फरदीनचे वडील फकीर शेख ट्रॅफिक वॉर्डन आहेत. दोन दिवसांपूर्वी शेजारी राहणाऱ्या मुलांनी गोंगाट केल्याने त्यांना शेख कुटुंबीयांनी जाब विचारला. त्यावेळी दोन्ही घरांतील मुलांमध्ये हाणामारी झाली. तेव्हा शेख कुटुंबीयांना बघून घेण्याची धमकी शेजाऱ्यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी फरदीन पत्रीपुलानजीकच्या दुकानात पेन आणण्यासाठी गेली असताना रिक्षातून आलेल्या दोन पुरुष व दोन महिलांनी तिला सुई टोचली. त्याने ती बेशुद्ध पडताच तिला कल्याण रेल्वेस्थानकात आणले. तेथे ती शुद्धीवर आली. तिने झटापट करत हाताला चावा घेत तेथून पळ काढला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. शेजाऱ्यांनीच तिचे अपहरण केले होते का, याचा तपास सुरू आहे.