घोडबंदरचा रस्ता गेला पुन्हा खड्ड्यात; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी महिनाभरापूर्वीच डागडुजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 11:21 IST2025-11-02T11:20:40+5:302025-11-02T11:21:12+5:30
रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे, वाहनचालकांची मोठी कसरत

घोडबंदरचा रस्ता गेला पुन्हा खड्ड्यात; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी महिनाभरापूर्वीच डागडुजी
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: सप्टेंबर महिन्यात मेट्रोच्या ट्रायल रनसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घोडबंदर भागात आले होते. त्यांच्यासाठी रस्ता खड्डेमुक्त करण्यात आला. परंतु आता महिना उलटत नाही, तोच येथील चकाचक केलेला रस्ता पुन्हा खड्ड्यांत गेला आहे. त्यामुळे दर महिन्याला या दोन्ही नेत्यांनी घोडबंदरला यावे, अशी अपेक्षा रहिवाशांनी केली आहे.
पावसाळ्यापासून घोडबंदर भागातील रस्त्याची चाळण झाली आहे. काही मराठी कलाकारांनी या रस्त्यावरून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली. खड्ड्यांचा मुद्दा घेऊन गेल्या दोन महिन्यांपासून येथील रहिवासी वारंवार रस्त्यावर उतरून उत्स्फूर्तपणे आंदोलन करीत आहेत.
रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे, वाहनचालकांची मोठी कसरत
२२ सप्टेंबर रोजी मेट्रो चारची ट्रायल रन घेण्यात आली होती. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. त्यांच्यासाठी येथील रस्ते चकाचक केले होते. आता महिना उलटत नाही, तोच या रस्त्यांना पुन्हा खड्डेच खड्डे पडले आहेत. रस्त्यांवर टाकलेले डांबरही वाहून गेले आहे.