कसाऱ्यात गॅस्ट्रोचे थैमान; चार वर्षीय मुलीचा मृत्यू, ३० जण रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 10:13 IST2025-10-30T10:13:30+5:302025-10-30T10:13:46+5:30
दोघांची प्रकृती चिंताजनक, दूषित पाण्याने लागण

कसाऱ्यात गॅस्ट्रोचे थैमान; चार वर्षीय मुलीचा मृत्यू, ३० जण रुग्णालयात
कसारा : कसाऱ्याजवळील अतिदुर्गम व संपूर्ण आदिवासी वस्ती असलेल्या फणसपाड्यातील ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. गॅस्ट्रोमुळे एका चार वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना शहापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गॅस्ट्रोची लागण झालेले ३० जण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.
फणसपाड्यातील ग्रामस्थांना दोन दिवसांपासून उलटी-जुलाबाचा त्रास होत असून, येथील अनेक ग्रामस्थ खासगी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, खर्डी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत होते. उपचारादरम्यान वेदिका भस्मा या चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर गॅस्ट्रोसह अन्य आजार उद्भवलेल्या दोघांना शहापूर येथे उपचारासाठी दखल करण्यात आले. तसेच पाड्यातील सहाहून अधिक रुग्णांवर खर्डी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, २० हून अधिक रुग्णांवर फणसपाडा येथे उपचार सुरू आहेत. गावातील अनेकांना अचानक उलट्या, जुलाब आणि अस्वस्थ वाटू लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, गावात सध्या तणावाचे वातावरण आहे.
पिण्यासाठी विहीरीचेच पाणी
अनेक वर्षापासून या पाड्यात पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी जलजीवन योजनेचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, अद्याप काम सुरू झालेले नाही.
पाऊस, अस्वच्छता, नाल्याचे पाणी हे विहिरीत जात असल्यामुळे विहिरीतील पाणी दूषित झाले असून, त्यातूनच ही साथ पसरल्याचे बोलले जात आहे. विहिरीशिवाय दुसरा पर्याय नसल्याने विहिरीतील पाणी जेवणासाठी, अंघोळीसाठी व पिण्यासाठी वापरले जाते.
दूषित पाणी पाठविले तपासणीसाठी
गॅस्ट्रोचे रुग्ण आटोक्यात येत असून, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. विहिरीतील दूषित पाणी तपासणीसाठी पाठवले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया म्हात्रे, डॉ. आशु शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथक, साथ निर्मूलन पथक काम करीत आहे.
आम्ही दोन दिवसांपासून गावात सर्वेक्षण करीत आहोत. आरोग्य अधिकाऱ्यांनीही येथे भेट देऊन पाहणी केली. एक गॅस्ट्रो संशयित रुग्ण दगावला आहे. बाकी रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तालुका आरोग्य विभाग, यावर योग्य त्या उपाययोजना करीत असून, आमचे एक पथक पाड्यात कार्यरत आहे- डॉ. भाग्यश्री सोनंपिपळे, तालुका आरोग्य अधिकारी, शहापूर