आधारवाडी डम्पिंगच्या जागेवर फुलविणार उद्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST2021-05-27T04:42:26+5:302021-05-27T04:42:26+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने मंगळवारपासून आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकणे बंद केले आहे. ही या वर्षातील मोठी अचिव्हमेंट आहे. ...

आधारवाडी डम्पिंगच्या जागेवर फुलविणार उद्यान
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने मंगळवारपासून आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकणे बंद केले आहे. ही या वर्षातील मोठी अचिव्हमेंट आहे. या जागेवरील सगळा कचरा बायोमायनिंग पद्धतीने हटविला जाईल. त्यानंतर या जागेवर उद्यान, सायकलिंग ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक विकसित केला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
महापालिका आयुक्तांनी बुधवारी आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्यासह अधिकारी ऑगस्टिन घुटे उपस्थित होते. या वेळी आयुक्तांनी सांगितले की, जवळपास १६ एकरच्या आसपास ही जमीन आहे. त्यावर आजमितीस २१ घनमीटर टन इतका कचरा आहे. त्यापैकी १० घनमीटर टन कचऱ्यापासून कम्पोस्ट खत तयार केले जाऊ शकते. तर अविघटनशील कचरा भिवंडी येथील एका दगडखाणीत बायो मायनिंग केला जाईल. ही जागा मोकळी झाल्यावर खाडीकिनारी रिव्हर फ्रंट विकसित करायचा आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत या जागेत उद्यान, सायकलिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक विकसित केले जाणार आहे. डम्पिंगच्या त्रासातून नागरिकांची सुटका झाली आहे. आता कचरा हा उंबर्डे आणि बारावे घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी पाठविला जाणार आहे. ५० टन ओल्या कचऱ्यावर पाच ठिकाणी असलेल्या बायोगॅस प्रकल्पात प्रक्रिया केली जात आहे. बारावे प्रकल्पाच्या संदर्भातील हरित लवादाकडे असलेली याचिका लवादाने निकाली काढली आहे. डोंबिवलीतही ५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक संस्था पुढे आली आहे. त्या ठिकाणी महापालिकेस काही खर्च करायचा नाही. महापालिका संबंधित संस्थेला केवळ कचरा प्रक्रियेसाठी देणार आहे. काही बड्या सोसायट्या ५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करीत आहेत.
वर्षाला साडेपाच कोटी रुपये वाचणार
आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकणे बंद झाल्याने महापालिकेचे वर्षाकाठी साडेपाच कोटी रुपये वाचणार आहेत. डम्पिंगवरील कचरा सपाटीकरण, परिसर दुर्गंधीमुक्त करणे यावर हा खर्च केला जात होता.
दोन बिल्डरांच्या विरोधात कारवाई
ज्या बिल्डरांना बांधकाम परवानगी देताना पर्यावरणाचा ना हरकत दाखला दिला गेला आहे, त्यांनी घनकचरा व्यवस्थापन नियमावलीचे पालन करायचे आहे. त्या अटीशर्तीवर त्यांना बांधकाम परवानगी दिली गेली आहे. शहरातील दोन बिल्डरांनी या अटीशर्तींचे पालन केलेले नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई केल्याचे आयुक्तांनी सांगितले. अन्य बिल्डरांनाही याच प्रकारची ताकीद दिली गेली आहे.
फोटो-कल्याण-आयुक्त पाहणी
---------------------