Garbage in Kalyan-Dombivali, problem of pits, harassment of citizens | कल्याण-डोंबिवलीत कचरा, खड्ड्यांची समस्या, नागरिक हैराण  

कल्याण-डोंबिवलीत कचरा, खड्ड्यांची समस्या, नागरिक हैराण  

- मुरलीधर भवार 
कल्याण : केडीएमसी हद्दीत कचरा, खड्डे या प्रमुख समस्या डोकेदुखी ठरत आहेत. आधारवाडी डम्पिंगच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. हे डम्पिंग बंद करण्यासाठी अन्य घनकचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेनुसार सुरू झालेले नाहीत. तर, काही प्रकल्पांचे काम अद्याप सुरू आहे. दुसरीकडे कंत्राटदार नियमितपणे कचरा उचलत नसल्याने शहरात कचऱ्याचे ढीग साचत आहेत.  

   दरवर्षी पडणाऱ्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. सध्या लोकल बंद असल्याने सगळा ताण रस्तेवाहतुकीवर येत आहे. अशातच खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीत भरच पडत आहे. दरम्यान, केडीएमसीत २३ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. त्यांच्या जोडीला भाजपही होता. मात्र, आता भाजपने त्यांच्यापासून फारकत घेतल्याने या समस्या सुटल्या नाहीत. मात्र, यासाठी शिवसेनेलाच दोष देण्यात भाजप धन्यता मानत आहे. 

 २७ गावांत ठणठणाट
केडीएमसी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करते. महापालिकेत २७ गावे समाविष्ट करण्यात आली, तेव्हा पाणीपुरवठ्याची स्वतंत्र योजना आखण्यात आली. त्यापैकी १८ गावे महापालिकेतून वगळली असून, उर्वरित नऊ गावे महापालिकेत आहे. मात्र, २७ गावांत पाणीसमस्या आजही कायम आहे.  

 १५ कोटी खर्चूनही खड्डे  
कल्याण पश्चिमेतील तीन आणि पूर्वेतील एक अशा चार प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यानंतर कल्याण- डोंबिवलीतील अन्य ४६ रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले. मात्र, डांबरी रस्त्यांवरील खड्डे दरवर्षी बुजविले जातात. रस्तेदुरुस्ती व खड्डे बुजविण्यावर १५ कोटींपेक्षा जास्त खर्च केला जातो. मात्र, दरवर्षी खड्डेपुराण काही संपत नाही.

 कचरा कंत्राटदाराला दंड
केडीएमसीने १० पैकी चार प्रभाग क्षेत्रांत कचरा उचलण्याच्या कामाचे खाजगीकरण केले आहे. मात्र, कंत्राटदाराकडून कचरा उचलण्यात अनियमितता होत आहे. त्याला वर्षाला मनपा १०७ कोटी रुपये मोजते. मात्र, तो कचरा वेळेवर उचलत नाही. तसेच कचऱ्याचे वर्गीकरण करत नाही. अनियमितताप्रकरणी त्याला एक कोटी २७ लाखांचा दंड ठोठावला आहे. 

काेंडीत गुदमरतो जीव
कल्याण शहराच्या प्रवेशद्वारांवर पुलांची कामे सुरू आहेत. त्यात दुर्गाडी खाडीपूल, नवीन पत्रीपुलाचा समावेश आहे. त्याचबरोबर डोंबिवलीतील कोपर दिशेकडील आणि ठाकुर्ली पुलाचे कल्याण दिशेला काम सुरू आहे. कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरी व काँक्रिटीकरण सुरू आहे. त्यातच खड्ड्यांमुळे कल्याण आणि डोंबिवलीत वाहतूककोंडी होत असल्यामुळे नागरिक बेजार झाले आहेत.  

ड्रेनेजची कामे सुरूच 
केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत मनपा हद्दीत दोन टप्प्यांत ड्रेनेजचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील काम ६५ टक्के, तर दुसऱ्या टप्प्यातील काम ५० टक्के झाले आहे. मात्र, काही मलवाहिन्या या प्रकल्पाशी जोडल्या गेल्या नसल्याने प्रकल्प कार्यान्वित झालेले नाहीत. गेल्या वर्षभरापासून त्याच्या चाचण्याच सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.  

कचऱ्याचे प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. डिसेंबरअखेरपर्यंत आधारवाडी डम्पिंग बंद करण्याचे उद्दिष्ट आहे. कचरा उचलण्याचे काम चार प्रभाग क्षेत्रांत कंत्राटदाराला दिले आहे. एका प्रक्रियेतून दुसऱ्या प्रक्रियेत जात असताना काही गोष्टींना विलंब होतो. कचरा वर्गीकरण ही जबाबदारी नागरिकांचीही आहे. त्यांनीही कचरा वर्गीकरणास सहकार्य करावे. राहिला प्रश्न खड्ड्यांचा, केडीएमसीतील महत्त्वाचे रस्ते हे काँक्रिटचे करण्यात आले आहेत. डांबरी रस्ते हे अतिवृष्टीमुळे दरवर्षी खराब होतात. त्यावर खड्डे पडतात. पावसात खड्डे बुजविण्यास विलंब झाला आहे. सध्या खड्डे बुजवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. कल्याण- शीळ रस्त्याचे सहापदरीकरण सुरू आहे. प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे स्वत: जातीने लक्ष ठेवून आहेत.
- विनीता राणे, महापौर, कल्याण-डोंबिवली

Web Title: Garbage in Kalyan-Dombivali, problem of pits, harassment of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.