कल्याण-डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST2021-05-27T04:42:21+5:302021-05-27T04:42:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राउंंड बंद केल्याचा दावा केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी करत असले, तरी, ...

कल्याण-डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राउंंड बंद केल्याचा दावा केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी करत असले, तरी, प्रत्यक्षात कल्याण व डोंबिवली शहरांसह २७ गावांत जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मनपा हद्दीतील सध्याच्या अंदाजे १८ लाख लोकसंख्येनुसार दररोज ८६६ टन कचरा तयार होतो. मात्र, मनपाच्या सांगण्यानुसार फक्त दररोज ५५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उपाययोजना असल्याचे दिसून येते, तर मग अन्य ३१६ टन कचऱ्यावर प्रक्रिया कोणी करायची? ही तर नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक आहे. भाजप याचा निषेध करत असल्याचे पत्र कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी बुधवारी आयुक्तांना दिले.
मनपाच्या १२७ प्रभागांपैकी केवळ काही प्रभागांतच ओला व सुका कचरा जमा केला जात आहे. त्यातच उंबर्डे व बारावे येथील डम्पिंग ग्राउंडवर ओला व सुका कचरा एकत्रच टाकला जातो. साधारणपणे घनकचरा मार्गदर्शक मानकानुसार प्रतिव्यक्ती प्रतिदिवशी ४८१ ग्रॅम कचरा उत्पन्नाचे प्रमाण आहे. सद्यस्थितीत उंबर्डे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद आहे. आतापर्यंत आधारवाडी येथे टाकला जाणारा कचरा बारावे येथे ओला व सुका कचरा, असा एकत्रितपणे टाकला जात आहे. आयुक्त व संबंधित अधिकारी तेथे दुसरे आधारवाडी तयार करत असल्याची टीका कांबळे यांनी केली. ओल्या कचऱ्याच्या पुरवठ्याअभावी १० बायोगॅस प्रकल्पांपैकी फक्त चारच प्रकल्प कार्यान्वित आहेत. आयुक्तांना संबंधित अधिकारी ही चुकीची माहिती देत आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीवर आयुक्तांनी विश्वास न ठेवता प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे कांबळे यांचे म्हणणे आहे.
स्वच्छ भारत अभियानात देशात दुसरा क्रमांक मिळवणारी नवी मुंबई मनपा तसेच ठाणे मनपानेही कचऱ्यावर अधिभार लावलेला नाही. मात्र, केडीएमसीचे आयुक्त घनकचरा व्यवस्थापनासंबंधित कुठलीही ठोस उपाययोजना कार्यान्वित नसताना, हा अधिभार येथील नागरिकांवर का लादत आहेत? त्याला भाजपचा तीव्र विरोध असल्याचेही कांबळे म्हणाले.
राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे
कोरोनाकाळात नागरिकांवर कराचे ओझे वाढवून काय साध्य होणार आहे? सगळीकडे अस्वच्छता आहे, याचा विचार होणार आहे? की नाही, असा सवाल करत कांबळे म्हणाले की, अधिभार लावून निधी मिळवता येईल. पण त्याचा विनियोग कसा करायचा, हे महत्त्वाचे असते. त्यामुळे राजकारण न करता समाजकारण करावे, असा टोलाही कांबळे यांनी विरोधकांना लगावला.
-----------