ठाण्यातील बाप्पा निघाले सातासमुद्रापार; परदेशात यंदा फक्त पर्यावरणस्नेही बाप्पांना मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 01:53 PM2021-06-20T13:53:36+5:302021-06-20T13:54:32+5:30

Thane : मुंबई, ठाणे, पुणे येथून दरवर्षी बाप्पांच्या मूर्ती परदेशात जात असतात. अमेरिका, कॅनडा, जर्मन, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड यांसारख्या देशांत बाप्पा जात आहेत.

Ganpati from Thane went overseas; This year, only eco-friendly Ganeshj are demanded abroad | ठाण्यातील बाप्पा निघाले सातासमुद्रापार; परदेशात यंदा फक्त पर्यावरणस्नेही बाप्पांना मागणी

ठाण्यातील बाप्पा निघाले सातासमुद्रापार; परदेशात यंदा फक्त पर्यावरणस्नेही बाप्पांना मागणी

googlenewsNext

-  प्रज्ञा म्हात्रे

ठाणे : गणेशोत्सवास सप्टेंबर महिन्यात असला तरी परदेशात मात्र तीन ते चार महिने आधीच भारतातून गणेशमूर्ती जाण्यास सुरुवात होते. यंदा ठाण्यातील बाप्पा सातासमुद्रापार निघाले असून परदेशातील गणेशभक्तांनीही यंदा पर्यावरणस्नेही गणेशमूर्तींना पसंती दिली आहे. त्यामुळे ठाण्यातून यंदा फक्त शाडूच्या आणि कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या मूर्तींची परदेशवारी होणार आहे. 

मुंबई, ठाणे, पुणे येथून दरवर्षी बाप्पांच्या मूर्ती परदेशात जात असतात. अमेरिका, कॅनडा, जर्मन, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड यांसारख्या देशांत बाप्पा जात आहेत. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात स्थायिक झालेले गणेशभक्त मोठ्या उत्साहात गणेशोत्सव तेथे साजरा करतात. यंदा त्यांनी फक्त पर्यावरणास्नेही बाप्पांना पसंती दिली आहे.

ठाण्यातून मे महिन्यात कॅनडा तर येत्या मंगळवारी ऑस्ट्रेलिया येथे तर येत्या दिवसांत नेदरलँड आणि जर्मनला मूर्ती जाणार आहेत. कॅनडाला गेल्या महिन्यात २५० मातीच्या आणि कागदाच्या लगद्यातील मूर्ती गेल्या होत्या तर ऑस्ट्रेलियाला ५०० मूर्ती जात आहेत. ६ इंच ते दीड फूटांची मागणी असल्याचे ठाण्यातील मूर्तीकार प्रसाद वडके यांनी 'लोकमत'ला सांगितले. 

गेल्यावर्षी परदेशात पीओपी आणि पर्यावरणस्नेही गणेशमूर्तीवर भर होता. यावर्षी केवळ पर्यावरणस्नेही गणेशमूर्तींना मागणी आहे. त्यामुळे परदेशात यंदा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा होणार आहव. पुढे नेदरलँड आणि जर्मनला १७५ गणेशमूर्ती जाणार असल्याचे वडके म्हणाले. 

यंदा शाडूच्या मूर्ती महाग
गेल्यावर्षीपेक्षा यंदा शाडूच्या मातीच्या मूर्तीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कच्चा माल महागल्याने ही वाढ असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. शाडूच्या मूर्तींचे दर ३५० पासून १५ ते १८ हजार पर्यंत तर पीओपी मूर्तींचे दर २५० ते १५ हजारपर्यंत आहे. 

स्थानिक गणेशभक्तांच्या बुकिंगला गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जवळपास ४० टक्के मूर्ती बुक झाल्या आहेत. स्थानिकांकडून शाडूच्या आणि पीओपी मातीच्या मूर्ती बुक होत असला तरी शाडूच्या मूर्तींना मागणी अधिक आहे. 

ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या बाप्पांच्या मूर्तींची पॅकिंग पूर्ण होत आहे. मंगळवारी ते ठाण्यातून निघणार आहेत. गेल्यावर्षीपासून पर्यावरणस्नेही बाप्पांला पसंती दिली जात आहे. यंदा मागणीत वाढ झाली आहे.
- प्रसाद वडके. 

Web Title: Ganpati from Thane went overseas; This year, only eco-friendly Ganeshj are demanded abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.