ठाण्यात सराईत सोनसाखळी चोरांची टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 22:45 IST2018-10-05T22:34:58+5:302018-10-05T22:45:48+5:30
ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला मीरा भार्इंदर आणि शहापूर भागातून अटक केली आहे. त्यांच्याकडून सोनसाखळीसह मोटारसायकल चोरीचे २७ गुन्हे उघड झाले आहेत.

ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मीरा-भार्इंदर आणि शहापूर भागात जबरीने सोनसाखळी चोरणा-या टोळीला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. या टोळीकडून सोनसाखळीचोरीच्या २३ आणि मोटारसायकलचोरीच्या चार अशा २७ गुन्ह्यांची उकल झाली असून आरोपींकडून सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे २० लाख ५७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ठाणे ग्रामीणच्या मीरा-भार्इंदर, मुरबाड, गणेशपुरी आणि शहापूर परिसरात दिवसा आणि रात्रीही सोनसाखळीचोरीचे प्रमाण अलीकडे वाढले होते. त्याअनुषंगाने हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी शहापूर, मीरा-भार्इंदर आणि गणेशपुरी विभागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके गठीत करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने केलेल्या तपासामध्ये मीरा-भार्इंदर भागातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोटारसायकलवरून आलेले दोघे सोनसाखळी हिसकावून पळून जात असल्याचे आढळले. यातील एक आरोपी परशुराम सॅलियन (३२, रा. नारंगी रोड, विरार) असल्याचे पोलीस रेकॉर्डवरून उघड झाले. त्यानुसार, सॅलियन आणि त्याचा साथीदार आनंदकुमार ऊर्फ सोनू सिंह (२८, पूनमनगर, अंधेरी) यांना २८ सप्टेंबर २०१८ रोजी अटक केली. त्यांनी नयानगर ५, मीरा रोड ३, काशिमीरा ९ आणि भार्इंदर १ अशा १८ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून १३ लाख तीन हजार ५०० रुपये किमतीचे ४४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि जबरी चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल असा १३ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यांना ८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या दोघांनी १२ पुरुषांच्या सोनसाखळ्यांसह आठ महिलांची मंगळसूत्रे हिसकावली. रात्री ९ ते ११ या दरम्यान टी-शर्ट परिधान केलेले पुरुष आणि भाजी घेण्यासाठी बाहेर पडणाºया महिलांना ही जोडगोळी लक्ष्य करत होती.
शहापूर, भिवंडी परिसरांतून महिलांची मंगळसूत्रे हिसकावणाºया गुंजल सांडे (२१), गोविंद ऊर्फ पप्या धमके (२१) आणि विजलय सातपुते (२५) या तिघांना सहायक पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून पाच सोनसाखळी, तर चार मोटारसायकलचोरीचे असे नऊ गुन्हे उघड झाले आहेत. या त्रिकुटाकडून १९० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पाच मोटारसायकली असा सात लाख १३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला आहे. त्यांना ५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिली.