भिवंडीत ई-फेरफारचा खेळखंडोबा
By Admin | Updated: March 20, 2017 02:00 IST2017-03-20T02:00:06+5:302017-03-20T02:00:06+5:30
राज्य सरकारच्या धोरणानुसार ई-फेरफार पद्धतीने शेतकरी, जमीन खरेदीविक्र ी करणारे तसेच विकासकांना सातबारा व फेरफार उतारे,

भिवंडीत ई-फेरफारचा खेळखंडोबा
वज्रेश्वरी : राज्य सरकारच्या धोरणानुसार ई-फेरफार पद्धतीने शेतकरी, जमीन खरेदीविक्र ी करणारे तसेच विकासकांना सातबारा व फेरफार उतारे, जमिनीची कागदपत्रे सहज उपलब्ध होण्यासाठी भिवंडीत महसूल विभागांतर्गत एनआयसी सॉफ्टवेअर कंपनीला ई-फेरफार तसेच सातबारा खाते उतारा आदींचे रेकॉर्ड संगणक प्रणालीमध्ये आणण्याचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, प्रणालीत सदोषपणा येत असल्याने ई-फेरफारचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या एनआयसी सॉफ्टवेअर कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजय कालन यांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्रकुमार कल्याणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दोन वर्षांपासून या कंपनीने महसूल खात्याला फसवण्याचे काम केले असून सेवेमध्ये कुठल्याही प्रकारची अद्ययावत सेवा पुरवण्याचे काम केलेले नाही. भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांचे वारस फेरफार, खरेदीविक्र ी फेरफार, ई-फेरफारप्रमाणे करण्याचे सरकारचे धोरण आहे.
मात्र, हे धोरण भिवंडी महसूल खात्यात कुचकामी ठरले आहे. साइट ओपन होत नसल्याने सातबारानुसार खरेदीखतही होत नाही. त्यामुळे सरकारचे कोट्यवधी बुडत आहेत. या घटनेस एनआयसी सॉफ्टवेअर कंपनी जबाबदार असून कंपनीचा सरकारबरोबर अद्ययावत व जलद सेवा पुरवण्याचा करार झालेला असला तरी शेतकरी, जमीन खरेदीदार, विकासक, महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी यांना रात्रभर त्या सॉफ्टवेअर लाइनवर जागता पहारा ठेवून काम करावे लागत आहे.
वेबसाइट ओपन होत नसल्याने कंपनीने जलद कामकाज करण्याच्या बहाण्याने तीन दिवस वेबसाइटचे काम बंद ठेवले आहे. मात्र, या सॉफ्टवेअर कंपनीला जलद सेवा पुरवण्यात अपयश आले असून ई-फेरफार पद्धतीमुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. (वार्ताहर)