पुढील भविष्य अंध:कारमय... शिक्षकांचा टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST2021-05-27T04:42:32+5:302021-05-27T04:42:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : ऐन कोरोना काळात न्यूइरा शाळेने १६ शिक्षक व ३ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काढल्याने त्यांचे भविष्य ...

पुढील भविष्य अंध:कारमय... शिक्षकांचा टाहो
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : ऐन कोरोना काळात न्यूइरा शाळेने १६ शिक्षक व ३ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काढल्याने त्यांचे भविष्य अंध:कारमय बनले आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने शिक्षकांना काम थांबविण्यास सांगितले आहे, कामावरून काढलेले नाही, अशी प्रतिक्रिया शाळा संस्थेचे सचिव संजय डाबरा यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-३ मध्ये इंग्रजी माध्यमाची विनाअनुदानित तत्त्वावरील ही शाळा असून पहिली ते चौथीपर्यंतचे १६ शिक्षक व ३ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शाळा प्रशासनाने झूम मिटिंग घेऊन, शाळेमध्ये येऊ नका, असे सांगितले. तसेच त्यांची देणी त्यांच्या बँक खात्यात जमा केली. या प्रकाराने भयभीत झालेल्या शिक्षकांनी नोकरी वाचविण्यासाठी व न्यायासाठी शिक्षक संघटनेकडे धाव घेतली. भाजप शिक्षक आघाडीच्या अध्यक्षा सिंधू शर्मा यांनी शाळा प्रशासनाकडे दाद मागितली. हा सर्व प्रकार महापालिकेचे प्रशासन अधिकारी बी. एन. मोहिते यांना सांगून, शिक्षकांच्या नोकऱ्या वाचवा, अशी विनंती केली. शिक्षक गेल्या १४ वर्षांपासून शाळेत काम करीत असून एक शिक्षक निवृत्तीला आला आहे.
मोहिते यांनी सांगितले की, शाळा विनाअनुदानित तत्त्वावर असल्याने शिक्षकांना ठेवणे व न ठेवणे ही त्यांची अंतर्गत बाब आहे. शिक्षकांनी याबाबत तक्रार केल्यावर शिक्षण मंडळाने शिक्षकांची बाजू घेऊन शाळा प्रशासनाला जाब विचारला. तसेच शिक्षकांना ऐन कोरोना काळात कामावरून काढून टाकू नका, असे लेखी बजावले आहे. तर शर्मा यांनी शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान, सचिव डाबरा म्हणाले की, पहिली ते दहावीपर्यंत यापूर्वी ७५० पेक्षा जास्त विद्यार्थी होते. ही संख्या ७५० वरून १५० वर आली. त्यामुळे शिक्षकांना पगार देणार कसे? असा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिक्षकांना कामावरून काढले नसून विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांना घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
-------------------------------------------------
शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार?
विनाअनुदानित व इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे अर्थचक्र लॉकडाऊनमुळे बिघडले आहे. शाळा बंद असल्याचे कारण पुढे करून अनेक पालकांनी शाळेचे शुल्क भरलेले नाही. फी येत नसल्याने शिक्षकांचा पगार व नोकरीवर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना सरकारने मदत करावी, अशी मागणी शिक्षक संघटनेकडून होत आहे.