शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 05:33 IST2018-08-09T05:33:02+5:302018-08-09T05:33:19+5:30
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे पार्थिव बुधवारी सायंकाळी आयएनएस हमला या सैन्यदलाच्या मुंबईतील तळावर विमानाने आणण्यात आले

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
मीरा रोड : शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे पार्थिव बुधवारी सायंकाळी आयएनएस हमला या सैन्यदलाच्या मुंबईतील तळावर विमानाने आणण्यात आले असून, उद्या सकाळी त्यांच्या मीरा रोड येथील घरी आणले जाणार आहे. सकाळी ९ पासून नागरिकांना अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर, मीरा रोडच्या वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौस्तुभ यांच्या वडिलांचे दूरध्वनीवरून सांत्वन केले.
काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना शहीद झालेले २९ वर्षीय मेजर कौस्तुभ यांचे पार्थिव सकाळी काश्मीरहून दिल्लीला आणण्यात आले. दुपारी ३ वाजता दिल्लीहून त्यांचे पार्थिव मालाडच्या आयएनएस हमला या लष्करीतळावर आणण्यात आले.
बुधवारी त्यांचे पार्थिव येण्याची शक्यता पाहता, महापालिकेने परिसरात तसेच मीरा रोड वैकुंठभूमीत साफसफाई करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून ठेवल्या होत्या. दरम्यान, सायंकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक यांनी राणे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी दूरध्वनीवरून मेजर राणे यांचे वडील प्रकाश यांचे सांत्वन केले. मेजर राणे व तुम्हा कुटुंबीयांचा सार्थ अभिमान असून, मीरा-भार्इंदरमध्ये त्यांचे स्मारक उभारणार असल्याचे सांगितले. शिंदे यांनी एकूणच व्यवस्थेचा आढावा घेतला, तसेच मराठा समाजास शहरातील बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. सकाळी पालकमंत्री विनोद तावडे यांनी राणे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. सकाळपासूनच नागरिकांनी राणे यांच्या निवासस्थानाजवळ गर्दी करण्यास सुरुवात केली होती. या वीरपुत्राला आदरांजली वाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. सोशल मीडियावरूनही शहीद राणे यांना आदरांजली वाहिली जात आहे.
मालाडच्या आयएनएस हमला या लष्करीतळावरून सकाळी ५ वाजता सैन्यदलाचे अधिकारी व जवान शहीद मेजर राणे यांचे पार्थिव घेऊन मीरा रोडला घरी येण्यास निघतील. सकाळी ६ च्या दरम्यान पार्थिव त्यांच्या शीतलनगरमधील हिरलसागर इमारतीमधील निवासस्थानी आणले जाईल. सकाळी ९ च्या सुमारास त्यांचे पार्थिव घरातून बाहेर आणले जाईल व नागरिकांसाठी अंत्यदर्शनास ठेवले जाणार आहे. सकाळी ११ च्या सुमारास अंत्ययात्रा निघणार असून, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
>पालकमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी शहीद मेजर राणे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी शहीद मेजर राणे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.