मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन बस मध्ये बुधवारी महिलांना मोफत प्रवास
By धीरज परब | Updated: March 7, 2023 19:15 IST2023-03-07T19:14:17+5:302023-03-07T19:15:03+5:30
महिला प्रवाश्याना दिवसभरात कोणत्याही बस मधून चक्क चकटफू प्रवास करता येणार आहे .

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन बस मध्ये बुधवारी महिलांना मोफत प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर महापालिकेने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च बुधवार रोजी परिवहन बस मध्ये महिलांना मोफत प्रवासाची भेट दिली आहे . त्यामुळे महिला प्रवाश्याना दिवसभरात कोणत्याही बस मधून चक्क चकटफू प्रवास करता येणार आहे .
७४ बसचा ताफा असून बससेवा एनसीसी विथ व्हीजीएफ तत्वावर मे. महालक्ष्मी कृपा इन्फ्रा या ठेकेदारा मार्फत चालविण्यात येत आहे. सध्या दैनंदिन ७० बस ह्या मीरा भाईंदर सह ठाणे , बोरिवली , जोगेश्वरी आदी १८ मार्गावर चालविण्यात येत आहेत. दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून परिवहन सेवेने एका दिवसांत प्रवास करणाऱ्या ९० हजार प्रवासी संख्येचा टप्पा गाठला होता .
परिवहन उपक्रमामार्फत मागील दोन वर्षापासून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना दिवसभर मोफत बस प्रवासाची सुविधा देण्यात येत आहे . २०२१ साली ११ हजार ५५२ तर २०२२ साली २१ हजार ४६३ महिलांनी महिला दिनी मोफत बस प्रवासाचा लाभ घेतला होता . महापालिका प्रशासन यंदा देखील महिलांना दिवसभर मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत महिला दिन साजरा करणार आहे .या सुविधेचा महिला प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"