शेतकरी जमीन भूसंपादनात 11.5 कोटी रुपयांची फसवणूक, आणखी 2 आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 21:03 IST2022-05-10T21:03:10+5:302022-05-10T21:03:44+5:30
नायब तहसिलदार गोसावी सध्या फरार असल्याने त्यांना अटक केल्या नंतरच या प्रकरणातील खरे चेहरे समोर येणार असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिली आहे

शेतकरी जमीन भूसंपादनात 11.5 कोटी रुपयांची फसवणूक, आणखी 2 आरोपींना अटक
भिवंडी : मुंबई-वडोदरा कॉरीडोर मार्गात भूसंपादन झालेल्या भिवंडी तालुक्यातील नंदीठणे येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचा ११ कोटी ६६ लाख ६४ हजार रुपयांचा शासकीय मोबदला बनावट शेतकरी उभे करून लाटणाऱ्या गुन्ह्यात आतापर्यंत सतरा जणांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली. आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी ठोठावली असून या गुन्ह्याचा मास्टर माईंड म्हणून मुख्य आरोपी उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांचे नाव समोर आले आहे.
नायब तहसिलदार गोसावी सध्या फरार असल्याने त्यांना अटक केल्या नंतरच या प्रकरणातील खरे चेहरे समोर येणार असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिली आहे. गोसावींच्या नावामुळे प्रांत कार्यालयातील आणखीही अधिकारी व कर्मचारी पोलिसांच्या रडारवर आले असल्याने प्रांत कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी या गुन्ह्यात पंधरा आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांनतर तपासात साखराबाई उर्फ अनिता बाळासाहेब वाघमारे व संतोष दत्तात्रय मोरे या दोघांना पोलोसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात नायब तहसीलदार गोसावी यांचे नाव समोर आल्याने या प्रकरणात प्रांत कार्यालयातील आणखीही अधिकारी व कर्मचारी अडकण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.