राष्ट्रवादीच्या चार नेत्यांची, चार दिशेला तोंडे

By नारायण जाधव | Published: September 5, 2022 11:01 AM2022-09-05T11:01:57+5:302022-09-05T11:03:32+5:30

गेल्या काही वर्षांत थातूरमातूर आंदोलने वगळता पक्षाचा एकही मोठा कार्यक्रम झालेला नाही. श्रेष्ठींतील अजित पवार यांची सिडकोतील शासकीय बैठक वगळता एकही मोठा नेता शहरात फिरकला नाही.

Four leaders of NCP, facing four directions | राष्ट्रवादीच्या चार नेत्यांची, चार दिशेला तोंडे

राष्ट्रवादीच्या चार नेत्यांची, चार दिशेला तोंडे

Next

नारायण जाधव, उप-वृत्तसंपादक

ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकल्यापासून पक्षाची नवी मुंबईतील ताकद अगदीच तोळामासा झाली आहे. एकेकाळी पक्षाचे महापालिकेवर एकहाती वर्चस्व होते. मात्र, त्यात गणेश नाईक यांच्या ताकदीचा प्रभाव होता. परंतु, पाच-सहा नगरसेवक वगळता पक्षाचे सर्वच नगरसेवक नाईक यांच्यासाेबत भाजपमध्ये गेल्याने पक्षाला लागलेली घरघर आजही कायम आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत घेतली. तिला नवी मुंबईतील पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते. परंतु, या सर्वांनी या बैठकीत पक्षाची नवी मुंबईत नेमकी ताकद काय, याची वेगवेगळी मते मांडून सावळागोंधळ असल्याचे दाखवून दिले. एवढेच नाही तर या बैठकीनंतर दोन-तीन दिवसांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे हे एकनाथ शिंदे सेनेत जाणार असल्याची पुडी कुणी तरी सोडली. यामुळे पक्षात किती बेशिस्त आहे, याचाही प्रत्यय कार्यकर्त्यांनी आणून दिला आहे. 

वास्तविक पाहता, गणेश नाईक यांच्या टीमने राष्ट्रवादी सोडल्यानंतर सुरुवातीला जितेंद्र आव्हाड यांनी माथाडी कामगारांची मोठी व्होट बँक असलेल्या नवी मुंबईत ताकद वाढविण्यासाठी मेहनत घेतली. कार्यकर्त्यांना नैतिक बळ दिले होते. त्यांच्यासोबत माथाडी नेते शशिकांत शिंदे आणि उरणहून नवी मुंबईत ‘बार, बार’ येणारे प्रशांत पाटील यांना निरीक्षक नेमले. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे-पाटील समर्थक अशोक गावडे यांना विधानसभेसाठी उभे केले. त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी बऱ्यापैकी मते घेतली होती. यामुळेच नंतर त्यांच्यावरच नवी मुंबई जिल्हा अध्यक्षपदाची धुरा सोपविली. मात्र, श्रेष्ठींनी यानंतर पक्षबांधणीकडे पाहिजे तसे लक्ष दिल्याचे कधीच दिसले नाही. पक्षाचा नेमका प्रदेशाध्यक्ष कोण, असा प्रश्नही तळागाळातील कार्यकर्ते एकमेकांना विचारताना दिसतात. 

एवढेच नाही तर राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर श्रेष्ठी स्थानिक नेत्यांना बळ देतील, अशी आशा होती. परंतु, ती आतापर्यंत फोल ठरली आहे. मधल्या काळात नेरूळमधील शिवसेनेचे नामदेव भगत यांच्यासारख्या जुन्या नेत्यांनी पार्थ पवार यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्याशी जवळीक साधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, श्रेष्ठींनी त्यांचा भ्रमनिरास केला. 

शशिकांत शिंदे हे पक्षाचे नेते असले तरी त्यांचे मन जास्तीत जास्त आपल्या मूळ सातारा जिल्ह्यातील मतदारसंघात रमते. उरणचे असलेले प्रशांत पाटील हे नवी मुंबईत अधूनमधून येत असले तरी त्यांचा जास्त वेळ सोशल मीडियात रमतो. दुसरे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी पक्षांतर्गत वादाला कंटाळून केव्हाच हातात कमळ घेऊन देवेंद्र फडणवीस यांचे नाव हातावर गोंदवून घेतले. यामुळे एकेकाळी राष्ट्रवादीचे हक्काचे मतदार असलेल्या माथाडी कामगारांत उघड उघड दोन गट पडले आहेत. पक्षाचे आणखी एक नेते चंद्रकांत पाटील अर्थात सी. आर. पाटील यांची माथाडी कामगारांसह स्थानिक आगरी कोळी समाजात ऊठबस असली तरी त्यांनाही पक्षाने बळ दिलेले नाही.  

गेल्या काही वर्षांत थातूरमातूर आंदोलने वगळता पक्षाचा एकही मोठा कार्यक्रम झालेला नाही. श्रेष्ठींतील अजित पवार यांची सिडकोतील शासकीय बैठक वगळता एकही मोठा नेता शहरात फिरकला नाही. वास्तविक, मुंबईनंतर एमएमआरडीए क्षेत्रातील सर्वांत सक्षम महापालिका म्हणून नवी मुंबईकडे पाहिले जाते. आता शरद पवार यांनीच पक्षबांधणीकडे लक्ष घातल्याने काय सकारात्मक बदल होतात, याकडे लक्ष लागले आहे.
 

Web Title: Four leaders of NCP, facing four directions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.