रेल्वेमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक: दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 21:23 IST2018-12-11T21:14:07+5:302018-12-11T21:23:03+5:30
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केद्राची अकादमी सुरु करुन तिथे रेल्वेत तिकीट तपासणीसाची हमखास नोकरीचे अमिष दाखवून एका तरुणीला चार लाखांचा गंडा घालणाऱ्या संजय भोसले आणि जोत्स्रा साळसकर या दोघांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे.

ठाणेनगर पोलिसांची कारवाई
ठाणे: रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस या पदावर नोकरीस लावण्याच्या नावाखाली ठाण्याच्या वागळे इस्टेट, श्रीनगर भागातील २६ वर्षीय महिलेची फसवणूक करणा-या संजय भोसले (४९, रा. मोहने , कल्याण) आणि जोत्स्रा साळसकर (४०, रा. कल्याण) या दोघांना ठाणेनगर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. त्यांना १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील तरुणीने कल्याणच्या भोसले अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता. तिथेच संजय भोसले यांनी तिला रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस म्हणून नोकरीला लावण्याचे अमिष दाखविले. त्यापोटी तिच्याकडून चार लाखांचा धनादेश घेऊन तो ४ डिसेंबर २०१८ रोजी ज्योत्स्रा साळसकर यांच्या नावाना वटविला. २०१७ पासून डिसेंबर २०१८ या काळात त्याच्यात हा व्यवहार झाला होता. वारंवार मागणी करुनही या तरुणीला नोकरी किंवा पैसेही त्याने परत केले नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने याप्रकरणी १० डिसेंबर रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक टी. एच. बच्छाव यांच्या पथकाने भोसले आणि साळसकर या दोघांना अटक केली. त्यांनी आणखी कोणाची अशा प्रकारे फसवणूक केली आहे का? याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.