कल्याणमधील दुहेरी हत्येप्रकरणी चौघांची चौकशी

By Admin | Updated: June 20, 2016 04:05 IST2016-06-20T04:05:58+5:302016-06-20T04:05:58+5:30

येथील पूर्वेकडील खडेगोळवली परिसरातील दुधकर कंपाउंडमध्ये राहणाऱ्या लीलाबाई (६०) आणि कमल दुधकर (७०) या वयोवृद्ध नणंद-भावजयीची निर्घृण हत्या

Four inquiries into double murder in Kalyan | कल्याणमधील दुहेरी हत्येप्रकरणी चौघांची चौकशी

कल्याणमधील दुहेरी हत्येप्रकरणी चौघांची चौकशी

कल्याण : येथील पूर्वेकडील खडेगोळवली परिसरातील दुधकर कंपाउंडमध्ये राहणाऱ्या लीलाबाई (६०) आणि कमल दुधकर (७०) या वयोवृद्ध नणंद-भावजयीची निर्घृण हत्या झाल्याचे शनिवारी रात्री उशिरा उघडकीस आले. घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याने ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असला, तरी या हत्येमागे स्थानिक परिचित व्यक्तीच असल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असले, तरी तपासकामाबाबत मात्र मौन बाळगले आहे.
नणंद-भावजयी या दोघी घरात एकट्याच राहत होत्या. शनिवारी शेजारी राहणाऱ्यांना त्यांच्या घराला कुलूप दिसले. कामानिमित्त दोघी बाहेर गेल्या असाव्यात, असे त्यांना आधी वाटले, परंतु बराच वेळ होऊनही त्या घरी न परतल्याने त्यांनी संशयावरून घराचा दरवाजा उघडला असता, दोघीही रक्ताच्या थारोळयात पडलेल्या होत्या. त्यांनी तत्काळ कोळसेवाडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यामुळे ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असावी की अन्य काही हेतूने, हे स्पष्ट झालेले नाही. संपत्तीच्या वादातूनही हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, परंतु तूर्तास पोलिसांनी याबाबत मौन बाळगले आहे. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात
आले. (प्रतिनिधी)

Web Title: Four inquiries into double murder in Kalyan