व्यापाऱ्याकडून हप्तावसुली करणा-या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 22:30 IST2019-01-03T22:22:01+5:302019-01-03T22:30:08+5:30
दुकान चालविण्यासाठी ३० हजारांची रोकड हाप्ता म्हणून जबरीने हिसकावून धमकी देत मारहाण आणि शिवीगाळ करणाºया सोनू यादव याच्यासह चौघांना वर्तकनगर पोलिसांनी २ जानेवारी रोजी अटक केली आहे.

वर्तकनगर पोलिसांची कारवाई
ठाणे : दुकान चालवायचे असेल, तर ३० हजारांचा हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देऊन सतीश यादव याला मारहाण करून ३० हजारांची रोकड हिसकावून पळणा-या सोनू यादव (१९), मदन ऊर्फ ओमप्रकाश यादव (३५), विजय यादव (३०) आणि बच्चा यादव (३१, रा. रामबाग, उपवन, ठाणे) अशा चौघांना वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्यांना ५ जानेवारी २०१९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
रामबाग, कृष्णा इस्टेट येथील रहिवासी सतीश यादव हे १ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वा.च्या सुमारास कामावरून घरी परतले. त्यावेळी त्यांच्याच घराच्या खाली असलेल्या दुकानातून सोनू याने ३० हजारांची रोकड घेऊन पळ काढला. त्यावेळी सोनूने त्यांचा पाठलाग करून पैसे घेतल्याचा जाब विचारला. तेव्हा ‘दुकान चालवायचे असेल, तर हप्ता द्यावा लागेल,’ असे सांगून सोनूसह त्याच्या इतर साथीदारांनी सतीशला जबर मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून दमदाटीही केली. याप्रकरणी सतीशने चौघांविरुद्ध जबरी चोरी, मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रार २ जानेवारी रोजी दाखल केली. ही तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुहास हट्टेकर यांच्या पथकाने या चौघांनाही अटक केली. सतीशकडून जबरी चोरी करणारे चौघेही त्याच्याच शेजारी राहणारे असून पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.