Palghar Crime: पालघरमधून क्रीडा जगतासाठी हादरवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या अंडर-१६ फुटबॉल संघात आपले कौशल्य सिद्ध केलेल्या एका प्रतिभावान खेळाडूचा मृतदेह पालघर जिल्ह्यातील मेंढवण खिंड जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी या घटनेमागे आत्महत्येचा संशय व्यक्त केला असला तरी, या तरुण खेळाडूच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. सागर सोरती असे या दुर्देवी फुटबॉलपटूचे नाव आहे. त्याच्या मृत्यूने क्रीडा क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला आहे.
पुण्याला जातो सांगून घराबाहेर गेला अन् नंतर संपर्क तुटला
मिळालेल्या माहितीनुसार, सागर सोरती हा १५ नोव्हेंबर रोजी आपल्या घरातून निघाला होता. त्याने कुटुंबीयांना पुण्याला फुटबॉल खेळायला जात आहे असे सांगितले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच १६ नोव्हेंबरपासून त्याचा कुटुंबाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली असतानाच, दोन दिवसांनंतर, १८ नोव्हेंबर रोजी पालघरमधील मेंढवण खिंडच्या घनदाट जंगलात पोलिसांना त्याचा मृतदेह एका झाडाला दोरीने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी त्याचा मोबाईल फोन असल्याने पोलिसांना तातडीने त्याची ओळख पटवणे शक्य झाले.
लग्नापूर्वीच कुटुंबावर आघात
या घटनेनंतर सागरच्या कुटुंबाने केलेला खुलासा अत्यंत धक्कादायक आहे. कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, सागर गेल्या जवळपास दोन वर्षांपासून तीव्र मानसिक तणावाखाली होता. याच महिन्यात त्याच्या लहान भावाचे लग्न ठरले होते, परंतु त्याने त्या लग्नासाठी नवीन कपडे शिवण्यासही स्पष्ट नकार दिला होता. या मानसिक तणावामुळेच त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
या घटनेची नोंद कासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी माहिती दिली की, मृतदेह शवविच्छेदनासाठी तातडीने मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच सागरच्या मृत्यूचे नेमके आणि खरे कारण स्पष्ट होईल, त्यानंतरच पोलीस पुढील तपास करतील.
Web Summary : Mumbai's Under-16 footballer found dead in Palghar forest. He left home saying he was going to Pune. Mental stress suspected as cause of death. Police investigating.
Web Summary : मुंबई के अंडर-16 फुटबॉलर पालघर के जंगल में मृत पाए गए। वह पुणे जाने की बात कहकर घर से निकले थे। मानसिक तनाव से मौत होने का संदेह है। पुलिस जांच कर रही है।