कोलशेत खाडीत परदेशी पाहुणा जखमी
By Admin | Updated: January 13, 2017 06:53 IST2017-01-13T06:53:58+5:302017-01-13T06:53:58+5:30
हिवाळा आल्यावर प्रजननासाठी भारताची वाट धरणारे

कोलशेत खाडीत परदेशी पाहुणा जखमी
ठाणे : हिवाळा आल्यावर प्रजननासाठी भारताची वाट धरणारे फ्लेमिंगो पक्षी यंदाही ठाण्यात दाखल झाले आहेत. मात्र, त्यातील एक फ्लेमिंगो दुर्दैवाने जखमी झाला आहे. त्याला कोणीतरी दगड मारून जखमी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हा परदेशी पाहुणा कोलशेत खाडी येथे जखमी अवस्थेत बुधवारी पक्षिप्रेमींना मिळून आला. त्याच्या उजव्या पंखाला फॅ्रक्चर झाल्याने मोठी जखम झाल्याने त्याला उभेही राहता येत नाही. त्यामुळे त्याला उपचारार्थ घोडबंदर रोडवरील ठाणे एसपीएसए या संस्थेत दाखल केले असून पशुवैद्य डॉ. सुहास राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. हा पाहुणा दोन ते अडीच फूट उंच असून त्याचे वजनही अडीच ते तीन किलो आहे. तसेच त्याचे वय एक वर्ष आहे. जखम बरी झाल्यावर त्याला सोडण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)