पितृछत्रापाठोपाठ त्या दोघींच्या डोक्यावरचे मातृछत्रही हरपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:51 IST2021-04-30T04:51:19+5:302021-04-30T04:51:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंब्रा : बुधवारी मुंब्य्रातील रुग्णालयास लागलेल्या आगीत ज्या दोन महिलांचा मृत्यू झाला होता, त्यातील यास्मिन ...

पितृछत्रापाठोपाठ त्या दोघींच्या डोक्यावरचे मातृछत्रही हरपले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : बुधवारी मुंब्य्रातील रुग्णालयास लागलेल्या आगीत ज्या दोन महिलांचा मृत्यू झाला होता, त्यातील यास्मिन सय्यद नावाच्या महिलेच्या पतीचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले होते. आता तिच्या अकस्मात निधनामुळे तिच्या दोन मुलींच्या डोक्यावरील पितृछत्रापाठोपाठ आता मातृछत्रही हरपले आहे.
यास्मिन मूळची शिक्षिका होती. परंतु, लॉकडाऊनमध्ये ती कल्याण येथील एका खासगी कार्यालयामध्ये काम करून मुलींचा सांभाळ करत होती. फुप्फुसामध्ये पाणी भरल्याने श्वास घेण्यास त्रास जाणवल्याने उपचारांसाठी तिला प्राइम क्रिटिकेअरमधील अतिदक्षता विभागात दाखल केले होते. बुधवारी रुग्णालयाच्या पहिल्या माळ्यावर लागलेल्या आगीच्या धुरामुळे तिचा श्वास कोंडल्यामुळे आगी नंतर उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करताना तिचा मृत्यू झाला होता. वडिलांपाठोपाठ आईचे छत्रही हरवल्यामुळे विनमयस्क अवस्थेत गेलेल्या त्या दोघी सध्या पेण येथे राहात असलेली त्यांची आत्या आणि काकांकडे राहाण्यास गेल्या आहेत, अशी माहिती यास्मिन यांचे भाऊ आजीम खान यांनी दिली.
पितृछत्रापाठोपाठ मातृछत्रही हरवल्यामुळे त्या दोघींसमोर उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न निर्माण होणार आहे. आम्ही त्यांना जमेल तशी सर्वतोपरी मदत करू; परंतु, शासनाने मृतांच्या नातेवाइकांना जाहीर केलेली आर्थिक मदत लवकरात लवकर मिळाल्यास त्यांच्या भविष्याबाबत (विवाह आदी) योजना आखणे सुकर होईल, असा मानस त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.