शिवसेनेच्या आंदोलनानंतर मीरा रोडच्या शांतीनगरमधील फेरीवाल्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 08:24 PM2017-11-06T20:24:55+5:302017-11-06T20:26:02+5:30

मीरा रोड - मीरा रोडच्या शांती नगरमध्ये भरणारा बेकायदा सोमवार बाजार बंद करण्यासह फेरीवाल्यांना हटवण्यासाठी स्थानिक शिवसेना नगरसेविकेसह शिवसैनिकांनी रात्रीपर्यंत उपोषण केले.

Following the movement of Shivsena, action taken against the hawkers of Shanti Nagar of Mira Road | शिवसेनेच्या आंदोलनानंतर मीरा रोडच्या शांतीनगरमधील फेरीवाल्यांवर कारवाई

शिवसेनेच्या आंदोलनानंतर मीरा रोडच्या शांतीनगरमधील फेरीवाल्यांवर कारवाई

googlenewsNext

मीरा रोड - मीरा रोडच्या शांती नगरमध्ये भरणारा बेकायदा सोमवार बाजार बंद करण्यासह फेरीवाल्यांना हटवण्यासाठी स्थानिक शिवसेना नगरसेविकेसह शिवसैनिकांनी रात्रीपर्यंत उपोषण केले. दरम्यान, पालिकेने आज सोमवार बाजार भरू न देतानाच फेरीवाल्यांवर कारवाई केल्याने मोकळे रस्ते पाहून नागरिकांसह वाहन चालक, दुकानदारांनी देखील समाधान व्यक्त करत कारवाईत सातत्य रहायला हवे अशी आशा व्यक्त केली.

शांतीनगरमधील सेक्टर १, २, ३, ४ व ५ मध्ये आधीच अरुंद रस्ते असताना त्यात फेरीवाले, हातगाडी वाले यांनी रस्ता व फुटपाथवर अतिक्रमण केले आहे. काही दुकानदारांनी देखील दुकाना बाहेर व्यवसाय थाटलाय. यामुळे शाांती नगरच्या या मुख्य रहदारीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. वाहन नेण्यास तर सोडाच पण चालणे देखील जिकरीचे बनते. यातुन महिला - मुलींची छेड, पाकिटमारी आदी प्रकार घडतात. नेहमीचे बसणारे फेरीवाले त्यातच बेकायदा भरणारा सोमवार बाजार यामुळे येथील सर्वसामान्य नागरिक त्रासले आहेत.

फेरीवाल्यां विरोधात कारवाईची मागणी सातत्याने होत असली तरी पालिका प्रशासनाह बाजार वसुली ठेकेदार व काही लोकप्रतिनिधी यांचे अर्थपुर्ण लागेबांधे असल्याने ठोस आणि सातत्याने कारवाईच होत नाही. सेना नगरसेविका दिप्ती भट यांनी देखील पालिके कडे सातत्याने सोमवार बाजार बंद करण्यासह फेरीवाले हटवुन रस्ते, फुटपाथ मोकळे करण्याची मागणी सातत्याने केली होती. या आधी उपोषणाचा इशारा दिला असता आयुक्तांनी कारवाईचे लेखी आश्वासन दिले होते. पण पालिका कारवाई करत नसल्याने आज सोमवारी सकाळपासून भट या गणेश चौकात उपोषणास बसल्या होत्या.

त्यांच्या समवेत राजू भोईर, हरिश्चंद्र आमगावकर, निलम ढवण, शर्मिला बगाजी ह्या नगरसेवकांसह माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर, उपजिल्हा संघटक स्रेहल सावंत, शहरप्रमुख प्रशांत पालांडे, तेजस बागवे आदींसह शिवसैनिकांनी देखील उपोषणात सहभागी झाले होते.

पालिकेच्या वतीने अतिक्रमण विभाग प्रमुख संजय दोंदे व प्रभाग अधिकारी जगदिश भोपतराव यांनी आंदोलकांची भेट घेऊन लेखी स्वरुपात कारवाईचे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण पालिका फेरीवाल्यांबद्दलचे धोरण निश्चित करून कारवाई करणार असे पत्रात म्हटल्याने आधी कारवाई करा , त्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला. पालिकेने कारवाई नाही केली तर शिवसेना आपल्या पध्दतीने कारवाई करेल व त्याची जबाबदारी पालिका आणि पोलीसांवर राहील असे अरुण कदम यांनी पालिका अधिका-यांना सुनावले.

अखेर दुपारपासून पालिकेचे फेरीवाला पथक प्रमुख भैरु नाईक, प्रकाश पाटील, भालचंद्र सारुस्ते सह कर्मचारी, बाऊंसर व पोलीस कर्मचारी यांनी कारवाई हाती घेत फेरीवाल्यांना शांती नगर मधील सेक्टर १ ते ५ तसेच मीरारोड स्थानकाजवळील नाक्यावर बसूच दिले नाही. सर्व फौजफाटा येथेच रात्रीपर्यंत तळ ठोकून होता.

कामावरुन परतणारया तसेच सायंकाळी बाजारासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी रस्ते, फुटपाथ मोकळे पाहुन समाधान व्यक्त केले. सदरची कारवाई सातत्याने होत रहावी अशी अशा त्यांनी व्यक्त केली. दिप्ती भट सह शिवसैनिकांनी रात्री उशिरा आपलं उपोषण मागे घेतलं. सोमवार बाजार कायमचा बंद करावा, पालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार सातत्याने कारवाई करावी व रस्ते, पदपथ मोकळे ठेवावे अन्यथा शिवसेना स्थानिक रहिवाशांसह आंदोलन तिव्र करेल असा इशारा भट यांनी दिलाय.

Web Title: Following the movement of Shivsena, action taken against the hawkers of Shanti Nagar of Mira Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.