पूरग्रस्तांची पुन्हा आवराआवर; शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:18 AM2019-08-06T00:18:20+5:302019-08-06T00:20:10+5:30

पुराचा दोनवेळा फटका, नागरिक अजूनही भीतीच्या छायेत

Flood re-infestation | पूरग्रस्तांची पुन्हा आवराआवर; शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त

पूरग्रस्तांची पुन्हा आवराआवर; शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त

Next

बदलापूर : २६ आणि २७ जुलै रोजी आलेल्या महापुराने शेकडो कुटुंबे बाधित झाली. पूर ओसरल्यावर त्यांनी आपल्या घरांची आणि सामानांची आवराआवर सुरू केली. यातून सावरून आठवडाही उलटत नाही, तोच रविवारी बदलापूरला पुन्हा पुराचा जोरदार फटका बसला. जी कुटुंबे आधीच उद्ध्वस्त झाली होती, त्यांना पुन्हा एकदा फटका बसल्याने आता त्यांचा धीर खचला आहे. तरीसुद्धा दु:ख बाजूला सारून पूरग्रस्त कुटुंबांनी पुन्हा आपल्या संसाराची आवराआवर सुरू केली आहे.

२६ आणि २७ जुलैच्या पुराचा फटका सहन केल्यावर त्याच कुटुंबांवर ४ आॅगस्टच्या पुराचा फटका सहन करण्याची वेळ पुन्हा आली आहे. रविवारी पहाटेपासून पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पूरग्रस्त सावध झाले होते. मात्र, पुन्हा घरात पाणी भरेल, असे वाटले नव्हते. मात्र, उल्हास नदीने पुन्हा आपले रौद्ररूप दाखवत पूरग्रस्तांची धास्ती वाढवली आहे. रविवारी बसलेल्या पुराच्या तडाख्यानंतर पुन्हा एकदा घर आवरण्यात ही कुटुंबे व्यस्त झाली होती. पहिल्या पुरात बाधित झाल्यानंतर नागरिकांना आलेल्या मदतीचे साहित्यदेखील रविवारच्या पुरात वाहून गेले. हेंदे्रपाडा, यादवनगर भागातील नागरिकांना दोन दिवस आधीच जे जीवनावश्यक साहित्य मिळाले होते, ते साहित्यही रविवारच्या पुरात भिजले. त्यामुळे अन्नधान्याची गरज नव्याने निर्माण झाली आहे. आधीच भिजलेले दुकानातील सामान फेकले असताना, या दुकानदारांनाही दुसऱ्यांदा पुराचा फटका सहन करावा लागला. सोमवारी दिवसभर पूरग्रस्तांची आवराआवर सुरू होती. पूर ओसरत आला असला तरी, अजूनही बदलापूरचा धोका कमी झालेला नाही.

पूर ओसरला; पंचनामे सुरू
भिवंडी : भिवंडी शहरासह ग्रामीण भागात तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात, दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त बाधित नागरिकांच्या मालमत्तेचा महापालिका प्रशासन आणि ग्रामीण भागात तहसीदारांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी, तलाठी यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सोमवारपासून हाती घेतले आहे. घरे, जनावरे वाहून गेली असतील अथवा मनुष्यहानी झालेल्या नागरिकांच्या पंचनाम्यांना प्राधान्य दिले जात आहे. नुकसानीचा आकडा निश्चित होण्यासाठी किमान चार दिवस लागणार आहेत. त्यानंतर, अहवालानुसार शासकीय मदत पूरग्रस्तांना दिली जाईल, अशी माहिती तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी दिली.
तीनबत्ती चौक, ईदगाह रोड, बाजारपेठ, शिवाजी चौक, शिवाजीनगर, नवीचाळ, म्हाडा कॉलनी, बंदर मोहल्ला, अंबिकानगर, पद्मानगर या भागात पाणी साचल्याने अनेक नागरिकांची दुकाने व घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती सामानासह मालाचे मोठे नुकसान झाले आहे, तर भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांच्या अन्नधान्यासह कपडे, भांडी व किमती वस्तूंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी नुकसान झालेल्या लोकांच्या मालमत्तेचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना दिल्याने सकाळपासून महसूल यंत्रणा कामाला लागली आहे.

Web Title: Flood re-infestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर