ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मागील तीन ते चार महिन्यापासून आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. असे असतानाही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह, ग्रामपंचायत आणि स्थानिकांकडून करण्यात येत असलेल्या काटेकोर नियोजनामुळे ग्रामीण भागातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पाच आरोग्य केंद्रांच्या परिक्षेत्रात मागील १४ दिवसांत एकही नवा कोरोना रुग्ण आढळला नसून ही पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रे कोरोनामुक्त असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामध्ये मुरबाड तालुक्यातील सर्वाधिक तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केला. अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड तालुक्यांमध्ये सुरुवातीच्या काळात कमी रुग्ण आढळत होते. कालांतराने या भागात दिवसाला शंभरहून अधिक रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सध्याच्या घडीला कोरोनाबाधितांची संख्या १९ हजार १५८, तर मृतांची संख्या ६०० वर पोहोचली आहे. मागील तीन ते चार महिन्यांपासून रुग्णांची संख्या आटोक्यात येत होती. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवड्यानंतर पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली. रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने, आरोग्य यंत्रणा सर्तक झाल्या आहेत. आरोग्य विभागाकडून रुग्ण आढळणाऱ्या विभागास १४ दिवस प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करुन आरोग्य पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यावर भर दिला जात आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात जनजागृती करणे, खासगी वैद्यकीय व्यवसायिकांना क्वारंटाईन सेंटर, फिव्हर क्लिनिक, अँटीजेन टेस्टिंग साईट याठिकाणी सेवा देण्यासाठी प्रवृत्त करण्यावर भर देत आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषद आरोग्य विभाग, आशा, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून कोरोनाचे गांभीर्य, त्यांचे परिणाम याबाबत केलेल्या जनजागृतीमुळे ३३ प्रथमिक आरोग्य केंद्रापैकी पाच आरोग्य केंद्रांच्या परिक्षेत्रात मागील १४ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळला नाही. ही पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रे कोरोनामुक्त असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
......................
चौकट :-१४ दिवसांत एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही
तालुका : कोरोनामुक्त प्रा.आ. केंद्र
अंबरनाथ : सोनावळे, भिवंडी : दाभाड, मुरबाड : मोराशी, शिरोशी, नारिवली