मासेमारी नौका दगडी बंधाऱ्यावर आदळली; लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 09:12 AM2020-08-05T09:12:34+5:302020-08-05T11:29:03+5:30

"प्राजक्ता IND- MM-604 ही नौका 2 ऑगस्ट रोजी मासेमारी साठी समुद्रात गेली होती. परंतु 3 ऑगस्ट पासून समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वारे आणि महाकाय लाटांच्या तडाख्याने बेजार झाल्याने मासेमारी न करताच 4 ऑगस्ट ला किनाऱ्यावर परत येण्यासाठी माघारी निघाली.

Fishing boats collided with a rocky embankment; Loss of millions | मासेमारी नौका दगडी बंधाऱ्यावर आदळली; लाखोंचे नुकसान

मासेमारी नौका दगडी बंधाऱ्यावर आदळली; लाखोंचे नुकसान

Next

हितेंन नाईक
लोकमत न्युज नेटवर्क
पालघर : समुद्रातील वादळी वाऱ्याचा फटका बसून सातपाटीच्या किनाऱ्यावर येणारी "प्राजक्ता" ही मासेमारी नौका दगडी बंधाऱ्यावर आदळून फुटली. या अपघातात नौकेसह लाखो रुपयांचे साहित्य नष्ट झाले असून 15 मच्छीमारांचे प्राण वाचले आहेत.

  सातपाटी मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे सभासद असलेले मोरेश्वर विष्णू चौधरी ह्यांच्या मालकीची "प्राजक्ता IND- MM-604 ही नौका 2 ऑगस्ट रोजी मासेमारी साठी समुद्रात गेली होती. परंतु 3 ऑगस्ट पासून समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वारे आणि महाकाय लाटांच्या तडाख्याने बेजार झाल्याने मासेमारी न करताच 4 ऑगस्ट ला किनाऱ्यावर परत येण्यासाठी माघारी निघाली. मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही नौका सातपाटीच्या समुद्रात पोहोचली. मात्र, त्याच दरम्यान मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याला सुरुवात झाल्याने खाडीत येण्यासाठी असणारा नौकानयन मार्ग दिसेनासा झाला होता.

त्यामुळे ह्या मार्गाच्या आजूबाजूला असणाऱ्या महाकाय खडकाचा धोका पाहता त्या नौकेचे तांडेल जितेश चौधरी ह्यांनी आपल्या नौकेची लोखंडी लोयली(अँकर) समुद्रात टाकून एका जागी स्थिर राहण्याचे ठरवले. मात्र, वादळाचा वेग वाढल्याने ही नौका फरफटत किनाऱ्यावरील दगडी बंधाऱ्यावर आपटली. महाकाय लाटांच्या माऱ्याने ह्या नौकेची पुरती वाताहत झाली असून इंजिनमध्ये पाणी शिरून नादुरुस्त झाले आहे. तर जाळे, फ्लोट्स आदी मासेमारी साहित्य वाहून गेले आहे. शासनाच्या एनसिडीसी योजनेचे 10 ते 12 लाख कर्ज आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँके कडून घेतलेल्या 5 लाखाच्या कर्जातून उभारलेली नौका पूर्ण उध्वस्त झाल्याने चौधरी कुटुंबावर मोठे संकट उभे राहिले आहे. या अपघातात नौकेतील 15 मच्छीमारांनी पोहून किनारा गाठत आपला जीव वाचविला.

Web Title: Fishing boats collided with a rocky embankment; Loss of millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.