खुशखबर... कल्याण ते वसई 'फेरी' ७० मिनिटांत, तीही अवघ्या २९ रुपयांत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 09:43 IST2018-03-28T18:29:08+5:302018-03-29T09:43:36+5:30
उल्हास नदी, ठाण्याची खाडी आणि किनाऱ्यांचा वापर करून मुंबई महानगर प्रदेश पट्ट्यात जलवाहतूक व्यवहार्य ठरू शकते.

खुशखबर... कल्याण ते वसई 'फेरी' ७० मिनिटांत, तीही अवघ्या २९ रुपयांत!
मुंबई: कल्याण आणि वसई दरम्यान लवकरच जलवाहतूक सुरू होणार आहे. डिसेंबर महिन्यापासून या फेरी सेवेचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे कल्याण ते वसई हे अंतर अवघ्या 70 मिनिटांत पार करता येणे शक्य होईल. सरकारच्या इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट (आयडब्ल्यूटी) योजनेंतर्गतही ही फेरी सेवा सुरू होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सोमवारी कल्याण-ठाणे ते वसई या मार्गावर डिसेंबरपासून ही फेरी सेवा सुरू होणार असल्याची घोषणा केली. हा मार्ग एकूण 47 किलोमीटरचा असेल. विशेष म्हणजे प्रवाशांना यासाठी प्रत्येकी 29 रूपये इतके माफक भाडे मोजावे लागेल. दर तीन वर्षांनी या भाड्यात 15 टक्क्यांनी वाढ होईल.
ठाणे महानगरपालिकेकडून इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट यंत्रणेची तीन टप्प्यांत अंमलबजावणी केले जाणे अपेक्षित आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात वसई ते ठाणे-कल्याण या मार्गाचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात ठाणे ते मुंबई आणि तिसऱ्या टप्प्यात ठाणे ते नवी मुंबई या मार्गावर जलवाहतूक सुरू करण्याचा मानस आहे. उल्हास नदी, ठाण्याची खाडी आणि किनाऱ्यांचा वापर करून मुंबई महानगर प्रदेश पट्ट्यात जलवाहतूक व्यवहार्य ठरू शकते. ठाणे महानगरपालिकेने यापूर्वीच या संपूर्ण प्रकल्पाचा विस्तृत आराखडा केंद्र सरकारला सादर केला आहे. या प्रस्तावाला लवकरच केंद्रांकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील 47 किलोमीटरच्या मार्गासाठी 600 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गाला राष्ट्रीय जलवाहतूकमार्ग क्रमांक 53 असे नाव देण्यात येईल. त्यामुळे कल्याण ते वसई दरम्यानच्या प्रवासासाठी लागणारा दोन तासांचा अवधी 70 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. त्यासाठी वसई, मीरा-भाईंदर, ठाणे आणि कल्याणलगतच्या समुद्री परिसरात 10 बोटी तैनात करण्यात येतील. सुरुवातीच्या काळात नागला, कोलशेत आणि पारसिक या बंदरांवरून बोटी सुटतील.