भिवंडीत मालगाडीवर लादलेल्या ट्रकच्या मालास लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 23:36 IST2018-11-15T21:54:22+5:302018-11-15T23:36:25+5:30
भिवंडी : वसई मार्गे भिवंडीरोड रेल्वे स्थानकाकडे भरधाव निघालेल्या मालगाडीवर लादलेल्या ट्रकमधील मालास गुरूवारी सायंकाळी अचानक आग लागल्याने रेल्वे ...

भिवंडीत मालगाडीवर लादलेल्या ट्रकच्या मालास लागली आग
भिवंडी: वसई मार्गे भिवंडीरोड रेल्वे स्थानकाकडे भरधाव निघालेल्या मालगाडीवर लादलेल्या ट्रकमधील मालास गुरूवारी सायंकाळी अचानक आग लागल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. परिसरांतील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून केलेल्या पाण्याच्या माराने आग नियंत्रणात आली. परंतू या मार्गावरून जाणा-या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडून पडले.
वसई रेल्वे स्थानकातून निघालेली मालगाडी भिवंडीरोड रेल्वेमार्गे दिवा स्थानकाकडे जात होती. सदर मालगाडीच्या प्लाटफॉर्मवर माल भरलेले ट्रक लादलेले होते. या ट्रकमधील सामान बाहेरून प्लास्टिक कापडाने बांधलेले होते. गुरूवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अचानक एका ट्रकवरील प्लास्टिक वेस्टनास आग लागली. त्याचबरोबर त्या ट्रकमधील माल देखील जळू लागला.या आगीचे हवेत पसरलेले धुराचे लोळ गाडीतील रेल्वे कर्मचा-यांनी पाहिल्या नंतर त्यांनी तालुक्यातील डूंगे-वडघर गावाजवळ ही मालगाडी थांबविली. ग्रामस्थांनी सुद्धा आग पाहिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीच्या ठिकाणी पाणी ओतले तर रेल्वे कर्मचा-यांनी आग प्रतिबंध साहित्य वापर करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली. ट्रकमधील मालास बाहेरून प्लास्टिक कापडाने बांधल्याने त्यावर रेल्वे वीज वाहिनीची ठिणगी पडल्याने ही आग लागली असावी,अशी माहिती आग विझविणा-या ग्रामस्थानी दिली. परंतू ट्रकमधील मालाचा खुलासा झाला नाही. माल भरलेले ट्रक वाहून नेताना ते ओव्हरलोड असल्यास त्यांचा रेल्वे वीज वाहिनीशी संपर्क होऊन आग लागण्याचा धोका होऊ शकतो,अशी शक्यता देखील यावेळी वर्तविण्यात आली. सायंकाळी लागलेल्या या आगीमुळे सुमारे तास भर रेल्वेची वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.त्या मुळे या रेल्वे मार्गावर चालणा-या अन्य रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पुर्णपणे कोलमडून पडले होते.