ठाण्यात २०८ खासगी रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा अहवालास मुदतवाढ, २८ इस्पितळे आढळली बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 00:50 IST2021-02-14T00:49:59+5:302021-02-14T00:50:23+5:30
private hospitals in Thane : हा अहवाल सादर न केल्यास व्यावसायिक आस्थापना चालविण्यासाठी आवश्यक असलेले अन्य परवाने दिले जाणार नसल्याचे ठाणे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

ठाण्यात २०८ खासगी रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा अहवालास मुदतवाढ, २८ इस्पितळे आढळली बंद
ठाणे : भंडारा दुर्घटनेनंतर ठाणे महानगरपालिका हद्दीतील सर्व खासगी रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाने शहरातील ३४७ खासगी रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेची तपासणी केली. या तपासणीअंती जवळपास २८ रुग्णालये बंद आढळली; तर जवळपास १११ रुग्णालयांनी आपल्या अग्निसुरक्षा परीक्षणाचा अहवाल सादर केला. मात्र, तो सादर न करणाऱ्या २०८ रुग्णालयांना २२ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
ठाणे शहरात रुग्णालयांतील अग्निसुरक्षेच्या दृष्टीने सर्व खासगी रुग्णालयाच्या इमारतीतील अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण (फायर ऑडिट) करण्याची सक्ती ठाणे महापालिकेने केली असून, परीक्षणाचा अहवाल सादर न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. हा अहवाल सादर न केल्यास व्यावसायिक आस्थापना चालविण्यासाठी आवश्यक असलेले अन्य परवाने दिले जाणार नसल्याचे ठाणे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून एकूण ३४७ रुणालयांची यादी अग्निशामन विभागास प्राप्त झाली होती. त्यांच्या अग्निसुरक्षेची पाहणी करण्यासाठी पथके तयार करून त्यानुसार सर्वांची तपासणी केली.