डोंबिवली - पश्चिमेकडील रेल्वे पादचारी पूल आणि स्कायवॉकला लागून असलेल्या महात्मा फुले रोडवरील डोंबिवली दरबार या हॉटेलला गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. त्या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नसली तरी त्यात हॉटेल मात्र पूर्णपणे जळुन खाक झाले.सूत्रांच्या माहितीनूसार गॅस सिलेंडरच्या लिकेज मुळे ही आग लागल्याची शक्यता होती. वातावरणात असलेला प्रचंड उष्मा त्यात भर दुपारच्या वेळेत ही आग लागल्याने क्षणार्धात आगीने रौद्र रुप धारण केले. आगीच्या ज्वाळा हॉटेलबाहेर फुटपाथ पर्यंत तसेच दुस-या मजल्यापर्यंत पोहचल्या होत्या. आग लागल्याचे समजात बघ्यांनी तेथे एकच गर्दी केली. याच हॉटेलबाहेर फुले रोडवर जाणा-या रिक्षांचा मोठा स्टँड आहे. रिक्षा चालकांनी प्रसंगावधान राखत तातडीने स्टँडवरील रिक्षा मागे घेत, रांग मागपासून सुरु केली.काही वेळाने घटनास्थळी कल्याण-डोंबिवली महाालिकेचे अग्नीबंब आले, त्यांनी आग अटोक्यात आणली. अग्नीशमन विभागाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी दिलेल्या माहितीनूसार कर्मचा-यांनी माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे हॉटेलचे पूर्ण नुकसान झाले असून आजुबाजुच्या दुकानांसह इमारतीला झळ बसली. या हॉटेलमध्ये चायनीजचे पदार्थ विशेष करुन मिळत असल्याची चर्चा सुरु होती. आग विझवण्यात आली असली तरी अग्नीशमन दलाच्या जवानांचे पुढील चौकशी काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरु होते.
डोंबिवली दरबार हॉटेलला आग, आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 19:31 IST