अखेर ‘अनुत्तीर्ण’ अनुजाला ८७ टक्के!
By Admin | Updated: June 19, 2016 04:17 IST2016-06-19T04:17:04+5:302016-06-19T04:17:04+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गलथान कारभारामुळे नवी मुंबईतील सेंट आॅगस्टिन शाळेच्या अनुजा अरगडे हिला चक्क एका विषयात अनुपस्थित दाखवून अनुत्तीर्ण केले होते.

अखेर ‘अनुत्तीर्ण’ अनुजाला ८७ टक्के!
- जितेंद्र कालेकर, ठाणे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गलथान कारभारामुळे नवी मुंबईतील सेंट आॅगस्टिन शाळेच्या अनुजा अरगडे हिला चक्क एका विषयात अनुपस्थित दाखवून अनुत्तीर्ण केले होते. ‘लोकमत’मध्ये या संदर्भातील सविस्तर वृत्त ९ जूनला प्रसिद्ध होताच बोर्डाने आपली चूक सुधारु न अनुजाने परीक्षा दिलेल्या संस्कृत विषयाचे गुण तिच्या गुणपत्रिकेत समाविष्ट केले आहेत. तिला या विषयात ८७ गुण मिळाले आहेत. तिची नाहक अनुपस्थिती दाखविलेला हिंदी विषय आता गुणपित्रकेतून वगळला असून ८७ टक्के गुणांनी ती उत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
परीक्षा प्रवेशपत्रामध्ये तिने संस्कृतऐवजी हिंदीची परीक्षा दिल्याचे दाखविले होते. ‘लोकमत’ च्या मदतीने अरगडे कुटुंबीयांनी मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांची भेट घेऊन हा प्रकार निदर्शनास आणला. त्यांनी गंभीर दखल घेत राज्य मंडळाकडून तिच्या संस्कृतच्या पेपरची माहिती घेतली. तब्बल ६० लाख पेपरमधून तिचा पेपर शोधण्यात आला.
दुरूस्ती वेळेत न झाल्याने घोळ
शाळेने अनुजाच्या रिसीटवरील विषयांच्या दुरुस्तीचे पत्र दिले होते, मात्र ते अनवधानाने दुरुस्त झाले नाही. वाशी कार्यालयातून राज्य मंडळाकडे याची दुरुस्ती न झाल्याने हा प्रकार घडला. पालकांनी ही चुक निदर्शनास आणून दिल्यानंतर राज्य मंडळाकडील ६० लाख पेपरमधून तिचा संस्कृतचा पेपर शोधण्यात आला. त्यातून तिला प्रत्यक्ष मिळालेल्या आणि अंतर्गत गुणांची पडताळणी करुन ते गुण तिच्या गुणपत्रिकेत समाविष्ट केले आहेत.
- दत्तात्रय जगताप, मुंबई विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
नव्या निकालाने आनंद झाला
आॅनलाईन निकालात अनुजा अनुत्तीर्ण असल्याचे दिसत होते. परंतु मंडळाचे अध्यक्ष जगताप यांनी तातडीने कार्यवाही करुन आठ दिवसांतच तिच्या संस्कृतच्या गुणांचा गुणपत्रिकेत समावेश केला. अजूनही बोर्डाच्या संकेतस्थळावर दुरुस्ती झाली नसली, तरी आम्हाला ती उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. आता तिच्या अकरावी प्रवेशाचा मार्गही मोकळा झाला आहे.
- भारती कैलास अरगडे, अनुजाची आई