भिवंडीत ७५३ अर्ज दाखल
By Admin | Updated: May 7, 2017 06:05 IST2017-05-07T06:05:39+5:302017-05-07T06:05:39+5:30
महानगरपालिकेच्या येत्या २४ मे रोजी ९० जागांकरिता होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शनिवारच्या अखेरच्या

भिवंडीत ७५३ अर्ज दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : महानगरपालिकेच्या येत्या २४ मे रोजी ९० जागांकरिता होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शनिवारच्या अखेरच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले. एकूण ७५३ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने दिली.
त्यामध्ये काँग्रेस ६६, भारतीय जनता पार्टी ६०, शिवसेना ६०, समाजवादी पार्टी ३६, राकाँपा ३२, कोणार्क विकास आघाडी २२, एमआयएम ९, भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंट १६ असे अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, कुठल्याही पक्षाने सर्वच्या सर्व जागा लढवलेल्या नाहीत.
शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह निवडणूक कार्यालयांत गर्दी केली होती. शहरातील आठ निवडणूक केंद्रांत कडक पोलीस बंदोबस्त लावलेला होता. विजेचा लपंडाव व सायबर कॅफेंची अपुरी संख्या यामुळे आॅनलाइन अर्ज भरण्यात अडचणी निर्माण होत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून शहरातील सायबर कॅफेंवर उमेदवारांनी गर्दी केली होती. बऱ्याच उमेदवारांनी शुक्रवारी रात्री आॅनलाइन अर्ज दाखल केले आणि शनिवारी त्याची प्रत निवडणूक कार्यालयात सादर केली. शिवसेना व भाजपाने आपल्या कार्यालयांत उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरण्याची सोय केली होती. काँग्रेसच्या कार्यालयात गेल्या चार दिवसांपासून शुकशुकाट होता. अखेरच्या दोन दिवसांत राकाँपा व समाजवादी पक्षांत समझोता झाल्याने समाजवादीच्या कार्यालयात लगबग सुरू होती. मात्र, कोणत्याही पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली नाही.
पालकमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री अडीच वाजेपर्यंत शहर शाखेवर बसून उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करीत होते.
काँग्रेसला रोखण्याकरिता कोणार्क
भाजपाने मुस्लिमबहुल प्रभागांत थेट पक्षाचे उमेदवार उभे न करता कोणार्क विकास आघाडीमार्फत उमेदवार उभे केले आहेत. भिवंडीत काँग्रेसला रोखण्याकरिता ही खेळी भाजपाने केल्याचे बोलले जाते. भाजपा अधिकृतपणे ६० जागा लढवत असून कोणार्क आघाडी २२ जागा लढवत आहे. भाजपाने प्रभाग क्र.१, ३, ४, ६, ७ मध्ये उमेदवार उभे केले नाहीत. हे प्रभाग भाजपाने कोणार्क विकास आघाडीसाठी सोडल्याचे सूत्राकडून समजते. कोणार्क आघाडीमुळे प्रभाग क्र. १ व ४ मधील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
मुस्लिमबहुल
१६ जागांवर शिवसेनेचे उमेदवार
शिवसेनेने प्रथमच मुस्लिमबहुल १६ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेने एकूण ६० जागा लढवण्याचा निर्णय घेतला असला, तरी पक्षाचे अधिकृतपणे ५५ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेच्या दोन उमेदवारांचे आॅनलाइन अर्ज अपलोड झाले नाहीत.
सपा-राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये परस्परांचे उमेदवार
समाजवादी पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाल्यानंतर सपाने ३६, तर राकाँने ३२ उमेदवार रिंगणात उतरवले. याखेरीज, काही ठिकाणी या दोन्ही पक्षांनी पॅनल उभे न करता एकेक उमेदवारही दिला आहे.
तसेच सपाच्या पॅनलमध्ये एखादा उमेदवार कमी पडत असेल, तर राष्ट्रवादीचा आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये सपाचा उमेदवार दिला आहे.
काँग्रेसच्या फुटीर गटाची
भिवंडी विकास आघाडी
निवडणूक यादीतील घोळ आणि त्रुटींविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या भिवंडी विकास आघाडीने १६ उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसच्या फुटीर गटाने ही आघाडी स्थापन केली असून काँग्रेसला आव्हान दिले आहे.
महिला कार्यकर्त्या नाराज
सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या कुटुंबांतील महिलांना उमेदवारी मिळवून दिल्याने आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी प्रस्थापितांवर टाकल्याने सर्वच पक्षांतील महिला कार्यकर्त्या तिकीटवाटपावर नाराज झाल्या आहेत. अशा नाराज तरुण कार्यकर्त्यांनी व महिलांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केले आहेत. मात्र, लागलीच त्याचा तपशील उपलब्ध झाला नाही.
गुरुवारी होणार चित्र स्पष्ट
सोमवार, ८ मे रोजी या उमेदवारी अर्जाची छाननी असून गुरुवार ११ मे रोजी अर्ज माघार घेण्याचा अखेरचा दिवस आहे. शुक्रवार, १२ मे उमेदवारांना चिन्हांचे वाटप करून अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.
रेहाना व नूर अन्सारी यांचे बंड
काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा रेहाना अन्सारी यांनी पक्षाचा राजीनामा देत प्रभाग क्र.५ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक डॉ. नूर अन्सारी यांनी समाजवादीचे तिकीट घेतले आहे. काँग्रेस पक्षात आलेल्या बहुतेक समाजवादीच्या नगरसेवकांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिले आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नगरसेवक वासुअण्णा नाडार यांना भाजपाने तिकीट दिले आहे.