मध्य रेल्वेच्या नव्या वेळापत्रकाचा पहिल्याच दिवशी उडाला फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 23:41 IST2019-12-14T23:41:36+5:302019-12-14T23:41:42+5:30
लोकल धावल्या विलंबाने । कसारा मार्गावरील प्रवाशांना फटका

मध्य रेल्वेच्या नव्या वेळापत्रकाचा पहिल्याच दिवशी उडाला फज्जा
डोंबिवली : मध्य रेल्वेच्या उपनगरी लोकलचे नवीन वेळापत्रक शनिवारपासून अमलात आले. मात्र, पहिल्याच दिवशी कर्जत, कसारा येथून लोकल विलंबाने धावल्याने या वेळापत्रकाचा फज्जा उडाला. विशेषत: कसारा मार्गावरील हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसला. नव्या वेळापत्रकाबाबत प्रवासी समाधानी नसल्याचे कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सचिव उमेश विशे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
विशे म्हणाले की, एरव्ही कसारा येथून पहाटे ४.२५ वाजता सुटणारी लोकल शनिवारी नवीन वेळापत्रकानुसार पहाटे ३.५१ वाजता सुटली. त्यामुळे अनेकांची ही लोकल चुकली. त्यानंतर, पहाटे ५ वाजता सुटलेल्या लोकलला प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने त्यांना त्रासाला सामोरे जावे लागले.
कसाऱ्याहून पूर्वी पहाटे सुटणाºया पहिल्या दोन लोकलमध्ये २५ मिनिटांचा फरक होता. मात्र, आता हा फरक एक तास नऊ मिनिटांचा झाल्याने पहिली लोकल चुकल्यास चाकरमान्यांना तासभर ताटकळत बसावे लागणार आहे. पहिली लोकल पकडल्यास अनेकांपुढे कामाच्या ठिकाणी जाऊन बाहेर बसण्याशिवाय पर्याय नाही. दुसरीकडे शनिवारी पहाटे ५ वाजता कसाºयाहून सुटलेल्या दुसºया लोकलला आसनगाव स्थानकातच प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे वासिंद, खडवली येथील प्रवाशांना या लोकलमध्ये चढताही आले नाही. हा त्रास कमी करण्यासाठी टिटवाळा येथे पहाटे ५ वाजून ५ मिनिटांनी सुटणारी लोकल आसनगाव येथून सोडावी, अशी मागणी प्रवाशांनी केली.
उद्या आणखी गोंधळ उडण्याची शक्यता
नव्या वेळापत्रकामुळे शनिवारी सकाळच्या पहिल्या सत्रात कल्याणपलीकडील प्रवाशांच्या नियोजनावर पाणी फिरले गेले. परंतु, सोमवारी या लोकलना गर्दी वाढेल. त्यामुळे अधिक गोंधळ उडेल. तेव्हा मात्र प्रवास करणे अवघड होईल, असेही विशे म्हणाले.