स्वत:च्या मुलीचा विनयभंग करणार्या नराधम पित्यास ठाण्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 21:12 IST2017-12-30T21:09:27+5:302017-12-30T21:12:41+5:30
दारूच्या आहारी गेलेला एक नराधम पिता गत सहा वर्षांपासून स्वत:च्याच मुलीचे शोषण करीत असल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात शुक्रवारी उघडकीस आला. वयाच्या बाराव्या वर्षापासून पीडित मुलगी बापाचा अत्याचार सहन करीत होती.

स्वत:च्या मुलीचा विनयभंग करणार्या नराधम पित्यास ठाण्यात अटक
ठाणे : लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणार्या बापावर चाकूने हल्ला करून स्वत:ची सुटका करणार्या ठाण्यातील एका मुलीची घटना ताजी असताना, पोटच्या मुलीचा सात वर्षांपासून लैंगिक छळ करणार्या आणखी एका नराधम पित्याला श्रीनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
दिलीप कृष्णा शिंदे (वय ४५) हे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून, तो वागळे इस्टेटचा रहिवासी आहे. आरोपीला १८ वर्षे वयाची एकुलती एक मुलगी असून, वयाच्या बाराव्या वर्षापासून तो तिचा लैंगिक छळ करीत होता. पत्नी झोपल्यानंतर तो मुलीच्या अंगावरून हात फिरवायचा. अंगावरील पांघरूण काढून तिला जवळ घ्यायचा. नोव्हेंबर २0११ ते मे २0१३ यादरम्यान हा प्रकार सुरू होता. मुलीने हा किळसवाणा प्रकार आईला सांगितला. आईने तिच्या वडिलांची समजुत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र दारूच्या आहारी गेलेला तिचा पती पुन्हा-पुन्हा मुलीला त्रास द्यायचा. त्यानंतर जवळपास चार वर्षे पीडित मुलगी आईसोबत मावशीकडे शिकण्यासाठी गेली. एप्रिल २0१७ मध्ये ती पुन्हा ठाण्यात शिकण्यासाठी आली. तेव्हापासून तिचा पुन्हा छळ सुरू झाला. या त्रासाला कंटाळून मुलीने शुक्रवारी श्रीनगर पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला लगेच अटक केली. आरोपी चालक असून, मुलीने बदनामीच्या भितीपोटी एवढी वर्षे तक्रार दिली नसल्याची माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी दिली.