शहापूर तालुक्यात प्रथमच आल्याची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST2021-04-04T04:41:26+5:302021-04-04T04:41:26+5:30
शेणवा : शहापूर तालुक्यातील मळेगाव येथील शेतकरी राजेश शिर्के यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेंद्रिय खताच्या जोरावर ३० गुंठा ...

शहापूर तालुक्यात प्रथमच आल्याची शेती
शेणवा : शहापूर तालुक्यातील मळेगाव येथील शेतकरी राजेश शिर्के यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेंद्रिय खताच्या जोरावर ३० गुंठा जागेत आल्याची लागवड केली आहे. तालुक्यात पहिलीच आल्याची लागवड असून, सात क्विंटल बियाणे लागले. लागवडीसाठी दोन लाख खर्च आला असून, २५० क्विंटल आल्याचे उत्पादन मिळणार आहे.
शेती व्यवसाय हा तोट्याचा असा गैरसमज असल्याने शेतीत करिअर करण्यास नवीन शेतकऱ्यांची पिढीही तयार नसून, शेती करून कुणाचे भले झाले आहे?, अशी समाजात चर्चा असताना व शेती क्षेत्र संकटात असतानाही, मळेगाव येथील राजेश या शेतकऱ्याने सरकारी नोकरी सांभाळून कृषी अधिकारी विलास झुंझारराव यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या ३० गुंठे असलेल्या शेतात व्यावसायिक शेतीचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून एप्रिल-मे महिन्यात आल्याची लागवड केली. आठ ते नऊ महिन्यांत पीक भरघोस आले. हे पीक नाशवंत नसल्याने बाजारभाव आल्यावरच पीक काढून बाजारपेठेऐवजी जागेवरच आल्याची विक्री करण्याचा राजेश यांचा मानस आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही रक्कम बाजूला ठेवून उरलेल्या रकमेतून पुढीलवर्षी यावर्षीच्या लागवडीत आणखी सुधारणा करून गुणवत्तापूर्वक आल्याची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचे नियोजन आतापासूनच सुरू केले आहे.
यावर्षीच्या लागवडीच्या उत्पादनातीलच बी-बियाणे शिल्लक ठेवून हेच बियाणे पुढीलवर्षी पुन्हा लागवड करणार व लागवड खर्च, मजुरी, वीजदर व लागणाऱ्या खताचे खर्च लक्षात घेऊन पुढील आराखडा आखणार असल्याचे शिर्के याने सांगितले. दरम्यान, नऊ महिन्यांत लाखो रुपयांचे उत्पन्न देणारा हा शेतीचा प्रयोग इतर शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा राजमार्ग ठरणार आहे.