निसर्ग वाचवण्यासह कारशेडचा तिढा सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी दिला त्यांच्या जमिनीचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 23:40 IST2025-07-23T23:38:51+5:302025-07-23T23:40:10+5:30
Mira Road: शहराचा मुख्य ऑक्सिजन स्रोत असलेली डोंगरीच्या डोंगरा वरील साडेबारा हजार पेक्षा जास्त झाडे काढण्यासह जैवविविधता, निसर्ग आणि शेतकऱ्यांचा पाणी स्रोत नष्ट करून कारशेड करू नका अशी मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने डोंगरी कारशेडचा विरोध वाढतोय.

निसर्ग वाचवण्यासह कारशेडचा तिढा सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी दिला त्यांच्या जमिनीचा प्रस्ताव
मीरारोड - शहराचा मुख्य ऑक्सिजन स्रोत असलेली डोंगरीच्या डोंगरा वरील साडेबारा हजार पेक्षा जास्त झाडे काढण्यासह जैवविविधता, निसर्ग आणि शेतकऱ्यांचा पाणी स्रोत नष्ट करून कारशेड करू नका अशी मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने डोंगरी कारशेडचा विरोध वाढतोय. त्यावर तोडगा काढण्यासाठी खोपरा शेतकरी मंडळाच्या शेतकऱ्यांनी कारशेडसाठी स्वतःची जमीन देऊ केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शेतकऱ्यांच्या प्रस्तावाची पडताळणी करून शासनास प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश एमएमआरडीए ला दिले आहेत. शासनाने प्रस्ताव मान्य केल्यास हजारो झाडां सह मुख्य ऑक्सिजन स्रोत असलेली हजारो झाडे, पाण्याचे स्रोत व शेती - बागायती, जैवविविधता, पक्षी - प्राणी आणि वाचणार असून कारशेडचा तिढा देखील सुटणार आहे.
मेट्रो ९ चे शेवटचे स्थानक हे मॅक्सस पुढील तोदिवाडी येथील बोस मैदान असून लगतच्या परिसरातील विकासकांच्या, खाजगी संस्था, मिठागरांच्या शेकडो एकर मोकळ्या जागा असताना कारशेडचे आरक्षण तिकडे टाकले नाही. मुर्धा - राई गावा मागील मोकळ्या जागेत टाकलेले आरक्षण मेट्रो मार्गीचा वळसा घालून चुकीचा मार्ग टाकल्याने त्याला विरोध झाला व आरक्षणच रद्द केले गेले. शेवटच्या स्थानका पासून सुमारे ७ किमी लांब तेही नैसर्गिक डोंगरावर सरकारी व खाजगी जागेत कारशेड आरक्षण टाकले. एमएमआरडीए ने सुरवाती पासून कारशेड कडे जाणारे मेट्रो मार्ग वेळोवेळी बदलले. विशेष म्हणजे २०२२ सालच्या अधिवेशनात स्वतः नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या तज्ञ अधिकाऱ्यांचा हवाला देत डोंगराळ व उंच सखल भाग असल्याने कारशेड तांत्रिक दृष्ट्या शक्य नसल्याचे म्हटले होते.
ऑक्सिजन स्रोत, जैवविविधता सह शेती नष्ट होणार म्हणून विरोध
डोंगरावर जाण्यासाठी आणि डोंगरावरील १२ हजार ४०० झाडे काढण्या सह डोंगर स्फोटकांनी उध्वस्त केला जाणार असल्याचे लक्षात येताच परिसरातील गावां सह शहरातील हजारो नागरिकांनी विरोध केला. आधीच प्रदूषण व तापमान वाढून जीवन असह्य झाले आहे. त्यात शहराचा मुख्य ऑक्सिजन स्रोत असलेली साडेबारा हजार पेक्षा जास्त झाडे काढण्यासह जैवविविधता, हजारो पक्षी - प्राणी आणि शेतकऱ्यांचा पाणी स्रोत नष्ट करून कारशेड करू नका अशी मागणी २१ हजार पेक्षा जास्त नागरिकांनी तसेच अनेक मच्छीमार व शेतकरी संस्थांसह सामाजिक संस्थांनी, बहुतांश राजकीय पक्षांनी विरोधाची निवेदने - सह्याद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सह शासन, एमएमआरडीए, पालिकेला केली. उपमुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री सरनाईक यांनी लोकांच्या निवेदनांवर तपासून सादर करा, कार्यवाही करा असे निर्देश देखील एमएमआरडीए, पालिकेला दिले.
पालिका - एमएमआरडीएची वृक्ष तोड वादात
दरम्यान पालिका व एमएमआरडीए ने वृक्ष नियम आणि न्यायालयीन व शासन आदेशांचे उल्लंघन करून खोटा अहवालच्या आधारे झाडे तोडण्याची प्रक्रिया चालवल्याच्या तक्रारी झाल्या. मात्र पहिल्या टप्प्यातील १४०६ पैकी ८३२ झाडे तोडण्याची घाई महापालिका व एमएमआरडीए ने चालविल्याने लोकांनी आंदोलने सुरु केली. झाडांची संख्या व वय कमी दाखविल्याचा घोटाळा उघडकीस आला. खाजगी जागेतील शेतकऱ्यांची झाडे तोडल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. एमएमआरडीए व पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी लोकांनी केली आहे. तर सादर झाडे आम्ही तोडली नाही असा दावा एकमेकांकडे बोट दाखवत एमएमआरडीए आणि पालिका करत आली आहे.
खोपरा शेतकरी मंडळाचा तोडगा काढण्यासाठी पुढाकार
दरम्यान सागरी मार्गाला जोडणारा मुर्धा - राई गावा मागून नवीन भाईंदर - उत्तन सागरी मार्ग जोड रस्ता वरूनच मेट्रो मार्गिका डोंगरी कारशेड कडे नेण्याचा मार्ग एमएमआरडीएने निश्चित केला. त्याच्या लगतच खोपरा येथे सुमारे १०० एकर शेतजमीन मोकळी आहे. शेतकऱ्यांनी कारशेड साठी स्वतःची सदर जमीन देण्याचा ठराव सह्यांसह करून दिला आहे. जागेचा रेडी रेकनर दरानुसार योग्य मोबदला मिळावा अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. डोंगरा ऐवजी या खाजगी जमीनीवर कारशेड स्थलांतरीत केल्यास कारशेड साठी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड होणार नाही. शहराचा मुख्य ऑक्सिजन स्रोत कायम राहून पर्यावरण, जैवविविधतेची हानी होणार नाही. डोंगर स्फोटकांनी उध्वस्त करणे टळून डोंगरावरील पाण्याचे स्रोत कायम राहून गावकऱ्यांची शेती - बागायती टिकून राहील अशी भूमिका शेतकरी मंडळाने घेतली.
परिवहन मंत्री सरनाईक यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
मंत्री सरनाईक यांनी वांद्रे येथील एमएमआरडीए मुख्यालयात एमएमआरडीए व पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल आणि विक्रम कुमार सह अन्य वरिष्ठ अधिकारी, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा तसेच मच्छीमार नेते बर्नड डिमेलो, जॉर्जी गोविंद, माजी नगरसेवक हेरल बोर्जिस, खोपरा शेतकरी मंडळाचे कार्याध्यक्ष सिरिल बोर्जिस, अध्यक्ष मंगेश पाटील, सचिव रमेश पाटील, डोंगरी गाव मंडळाचे क्लेटस नुनिस, तारोडी गावचे वेन्सी मुनीस, अजित गंडोली, बॉनी डिमेलो आदी उपस्थित होते. त्यात खोपरा येथील जागेत कारशेड साठी शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावाचा अभ्यास करून शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने झाडे तोडली जाऊन निसर्ग व पर्यावरणाची हानी होऊ नये ह्या मताचे आपण आहोत. आणि ते वाचवण्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध असेल तर त्याचा प्राधान्याने विचार केला पाहिजे असे सरनाईक म्हणाले.