लॉकडाऊनच्या आघाताने तुटली कुटुंबाची नाळ, पत्नीचा शोध, मुलांच्या ताब्यासाठी धडपड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 09:05 AM2020-12-11T09:05:37+5:302020-12-11T09:06:11+5:30

लॉकडाऊनमध्ये व्यवसाय गेल्याने अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला. यातूनच कुटुंबाची वाताहत झाल्याचे वास्तव नुकत्याच घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेतून उघड झाले आहे.

Family umbilical cord broken by lockdown | लॉकडाऊनच्या आघाताने तुटली कुटुंबाची नाळ, पत्नीचा शोध, मुलांच्या ताब्यासाठी धडपड

लॉकडाऊनच्या आघाताने तुटली कुटुंबाची नाळ, पत्नीचा शोध, मुलांच्या ताब्यासाठी धडपड

Next

-  प्रशांत माने
 
डोंबिवली : लॉकडाऊनमध्ये व्यवसाय गेल्याने अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला. यातूनच कुटुंबाची वाताहत झाल्याचे वास्तव नुकत्याच घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेतून उघड झाले आहे. तान्हुली मुले बेवारस स्थितीत सोडून बेपत्ता झालेल्या पत्नी रत्नमालाचा एकीकडे शोध घेत असताना दुसरीकडे मुलांचा ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात सुब्रत साहू यांची सुरू असलेली धडपड काळजाला हात घालणारी आहे.

कचोरे खाडीच्या परिसरात दोन लहान मुलांना सोडून रत्नमाला बेपत्ता झाली. चार दिवस उलटूनही तिचा शोध लागलेला नाही. मुलांना डोंबिवलीतील ‘जननी आशिष’ या बालसंगोपन केंद्रात ठेवले आहे. त्यांचे वडील सुब्रत यांची पत्नीचा शोध घेण्याबरोबरच मुलांचा ताबा घेण्यासाठीही धडपड सुरू आहे.
साहू कुटुंब ठाकुर्लीतील ९० फुटी रोड परिसरात राहते. सुब्रत यांचा सलूनचा व्यवसाय होता, तर रत्नमाला ब्युटी पार्लर चालवायची. परंतु, लॉकडाऊनमध्ये दोघांचे व्यवसाय बंद पडले. त्यातच सुब्रत यांचा अपघात झाल्याने हे कुटुंब पुरते कोलमडले होते. या ताणातूनच रत्नमालाने आत्महत्या केली का, अशी शंका ती बेपत्ता झाल्याने उपस्थित होत आहे. परंतु, खाडीकिनारी तिचा शोध लागलेला नाही. त्यामुळे तिने आत्महत्या केली की अन्य काही, या चर्चांनाही उधाण आले आहे. सुब्रत हे पत्नीच्या शोधासाठी एकटेच सर्वत्र फिरत आहेत. त्यांच्या सोबतीला ना त्यांचे नातेवाईक अथवा मित्र. विष्णूनगर आणि टिळकनगर पोलीस ठाण्यांची वारी असो. तसेच मुलांच्या ताब्यासाठी उल्हासनगरमधील बालकल्याण समितीपुढे सुनावणीसाठी जाणे असो, यात त्यांची फरफट होत आहे.

मुले ‘जननी आशिष’ बाल संगोपन केंद्रात असल्याने सुब्रत यांनी तेथे भेटीसाठी बुधवारी धाव घेतली. परंतु, कोरोनाच्या नियमाप्रमाणे मुले पाच दिवस क्वारंटाइन असल्याने ती जवळून भेटू शकली नाहीत. लांबूनच त्यांना मुलांना पाहता आले. दरम्यान, मुलांचा ताबा मिळण्यासाठी अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत. पोलीस ठाण्यात हे प्रकरण असल्याने त्यांचीही परवानगी लागणार असून मुलांची काळजी घेण्याची हमी मिळाल्यावरच त्यांचा ताबा सुब्रत यांना मिळणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

सांभाळण्यासाठी महिला असेल, तरच मुलांचा ताबा
घरात मुलांचा सांभाळ करण्यासाठी सक्षम महिला असल्यास मुलांचा ताबा घेऊ शकता, असा निर्णय बाल कल्याण समितीने गुरुवारच्या सुनावणीदरम्यान दिल्याने सुब्रत यांना दिलासा मिळाला आहे. 
सुब्रत घरी सध्या एकटेच आहेत. त्यामुळे मुलांना सांभाळण्याची व्यवस्था 
केल्यानंतरच मुलांना घरी नेता येणार आहे. तोपर्यंत जननी आशिष येथेच दररोज मुलांना भेटण्याची परवानगीही त्यांना देण्यात आली आहे.  

Web Title: Family umbilical cord broken by lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Familyपरिवार