खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून प्रवाशांना बनावट कोविड अहवाल, गुजरातला जाणाऱ्या बसमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 05:41 AM2021-04-14T05:41:52+5:302021-04-14T05:42:19+5:30

Crime News :कोरोनाचा संसर्ग फोफावल्याने अन्य राज्यांत जाणाऱ्या वा येणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे.

Fake covid-19 reports to passengers from private travel operators, types of buses going to Gujarat | खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून प्रवाशांना बनावट कोविड अहवाल, गुजरातला जाणाऱ्या बसमधील प्रकार

खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून प्रवाशांना बनावट कोविड अहवाल, गुजरातला जाणाऱ्या बसमधील प्रकार

Next

मीरा रोड : खासगी ट्रॅव्हल्सने गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांना ट्रॅव्हल्सवालेच जास्त पैसे आकारून चक्क बनावट कोविड चाचणी अहवाल बनवून देत असल्याचे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत उघड झाले आहे. ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल करून नीता व पवन ट्रॅव्हल्समधील आरोपींचा काशिमीरा पोलीस शोध घेत आहेत. बनावट दाखले देणारी मोठी टोळीच सक्रिय असल्याची शक्यता आहे.
कोरोनाचा संसर्ग फोफावल्याने अन्य राज्यांत जाणाऱ्या वा येणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. मुंबई परिसरातून गुजरातला बसने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या काही ट्रॅव्हल्सचे मालक व चालक हे प्रवाशांकडून जास्त पैसे घेऊन त्यांना बनावट कोविड चाचणी अहवाल देत असल्याची माहिती मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा कक्ष १ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांना मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कुराडे यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे एकच्या सुमारास घोडबंदर नाका येथे मिळालेल्या माहितीनुसार पवन ट्रॅव्हल्सची बस अडवली. बसमध्ये ३१ प्रवासी तसेच बसचालक व वाहक असे मिळून ३३ जण होते. त्यांच्याकडील आरटीपीसीआर कोविड चाचणी अहवालाची मागणी केली असता १९ प्रवासी आणि चालक व वाहक यांच्याकडे असलेले आरटीपीसीआर कोविड चाचणी अहवाल बनावट असल्याचे आढळले. बसमध्ये नियमही पाळले गेले नव्हते.
कोविड चाचणी अहवाल बनवून देतो सांगून ट्रॅव्हल्सवाल्यांनीच या १९ प्रवाशांकडून प्रत्येकी ३०० रुपये घेऊन हे बनावट चाचणी अहवाल बनवून दिले होते, तर अन्य १२ प्रवाशांकडून चाचणी अहवाल बनवून देण्यासाठी प्रत्येकी ३०० रुपये घेण्यात आले होते. मात्र, अहवालच दिला नाही. काशिमीरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ट्रॅव्हल्स कंपनीचा मालक,व्यवस्थापक अद्याप फरार    
अटक आरोपींपैकी बसचालक दीपसिंग चौहान व देवीसिंग चावडा आणि वाहक जितेंद्रसिंग चौहान हे तिघेही अहमदाबादमध्ये राहणारे आहेत, तर पवन ट्रॅव्हल्सचा मालक हितेशभाई, नीता ट्रॅव्हल्सचा व्यवस्थापक संदीप व कर्मचारी जिग्नेश पटेल या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Fake covid-19 reports to passengers from private travel operators, types of buses going to Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.