एकतर्फी प्रेमभंगातून विद्यार्थ्याचा स्वत:वर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 22:45 IST2018-02-27T22:45:14+5:302018-02-27T22:45:14+5:30
घटनास्थळी गावठी कट्टा सापडल्याने पोलिसांना संशय आला.

एकतर्फी प्रेमभंगातून विद्यार्थ्याचा स्वत:वर गोळीबार
भार्इंदर - काशिमिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रॉयल कॉलेज परिसरात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास एका युवकावर गोळीबार झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे विभागाच्या काशिमिरा शाखेला देण्यात आली. शाखेसह काशिमिरा पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाय््राांनी घटनास्थळी धाव घेतली असता जखमी अवस्थेतील त्या युवकास पोलिसांनी त्वरीत मीरारोड येथील भारतरत्न स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यानंतर त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले.
पोलिसांनी त्या युवकाकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला दोन अज्ञात इसमांनी आपल्यावर गोळीबार केल्याचे सांगितले. मात्र घटनास्थळी गावठी कट्टा सापडल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी त्याची सखोल चौकशी केली असता त्या युवकाने एकतर्फी प्रेमभंगातून आपणच स्वत:वर गोळीबार केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याचे नाव जयप्रकाश दिनेश गिरी (२१) असे असुन तो २०५, निळकंठ सोसायटी, हनुमान नगर, समता नगर, कांदिवली पुर्व, मुंबई येथे राहतो.
तो एका महाविद्यालयात कॉमर्सच्या शेवटच्या वर्गात शिकत असुन आपल्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी तो घरात खाजगी शिकवणी घेतो. त्याचे, तो शिकत असलेल्या महाविद्यालयातीलच एका विद्यार्थीनीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने त्याबाबत त्या विद्यार्थीनीला सांगुन आपल्यासोबत लग्न करण्याची तीला गळ घातली. त्याला त्या विद्यार्थीनीने नकार दिल्याने त्याने रागाच्या भरात स्वत:वर गावठी कट्यातून कंबरेजवळ गोळी झाडल्याचे चौकशीतुन समोर आले. हा कट्टा त्याने उत्तरप्रदेशातील आझमगड येथून आणल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी त्या विद्यार्थ्यावर हत्यारबंदी कायद्यासह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी काशिमिरा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असुन अधिक तपास मीरारोड विभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक अतुल कुळकर्णी हे करीत आहेत.