ठाण्याला अतिरिक्त पाणी

By Admin | Updated: October 14, 2016 06:35 IST2016-10-14T06:35:06+5:302016-10-14T06:35:06+5:30

भातसा आणि बारवी धरणांतूनही येत्या काळात अतिरिक्त २०० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी उचलण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला

Extra water to Thane | ठाण्याला अतिरिक्त पाणी

ठाण्याला अतिरिक्त पाणी

ठाणे : भातसा आणि बारवी धरणांतूनही येत्या काळात अतिरिक्त २०० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी उचलण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात भातसा धरणातून १०० दशलक्ष लीटर पाणी उचलण्याचा प्रस्ताव येत्या २० आॅक्टोबर रोजी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. बारवीच्या पाण्यासंदर्भातील महत्त्वाचा करार एमआयडीसी आणि पाटबंधारे विभागाशी लवकरच करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.
बारवी धरणाची उंची वाढल्याने त्याची पाणी साठवण्याची क्षमता वाढली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार ज्या महापालिकांना या धरणातून पाणीपुरवठा होणार आहे, त्यात्या महापालिकांनी या धरणाच्या कामात विस्थापित नागरिकांना आपापल्या प्राधिकरणात नोकरी देणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार, ठाणे महापालिकेनेदेखील यातील काहींना नोकरीत सामावून घेण्याचे निश्चित केले आहे. ठाण्याला धरणातून पाणीपुरवठा होणार असून त्यानुसार पालिका या धरणातून १०० दशलक्ष लीटर पाणी उचलणार आहे. यापूर्वी महापालिका येथून १०० दशलक्ष लीटर पाणी उचलत होती. परंतु, आधी ठरवलेल्या कोट्यानुसार धरणाची उंची वाढवल्यानंतर शिल्लक असलेले १०० दशलक्ष लीटर पाणी देण्यात येईल, हे ठरले होते. त्यानुसार, आता येथून १०० दशलक्ष लीटर पाणी उचलण्यासाठी संबंधित यंत्रणेशी पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. तसेच येथील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावूनदेखील घेतले जाणार आहे.
दरम्यान, भातसामधूनदेखील ठाणे महापालिका आता अतिरिक्त १०० दशलक्ष लीटर पाणी उचलणार आहे. यापूर्वी ठाणे महापालिका भातसामधून २०० दशलक्ष लीटर पाणी उचलत होती. परंतु, आता अतिरिक्त १०० दशलक्ष लीटर पाणी उचलणार असल्याने महापालिकेला येथून एकूण ३०० दशलक्ष लीटर पाणी मिळणार आहे. ठामपाला सध्या शहरासाठी ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असून वाढीव पाण्यामुळे ठाण्याला भविष्यात ६८० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होणार आहे. वाढती लोकसंख्या आणि त्यांना लागणारे पाणी याचा अभ्यास करूनच हा निर्णय घेतला आहे.

Web Title: Extra water to Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.