Exhaust from the tanker of the freight | मालगाडीच्या टँकरमधून वायुगळती
मालगाडीच्या टँकरमधून वायुगळती

कसारा : मुंबईहून कसाराकडे जाणारी मालगाडीतील गॅस टँकरमधून खर्डी स्थानकाजवळ सकाळी ८ वाजता वायुगळती सुरू झाल्याची घटना घडली. भारत पेट्रोलियमच्या गॅस टॅँकरची वाहतूक करणारी ही गाडी खर्डी-कसारा स्थानकांदरम्यान उभी होती. या गाडीतील एका टॅँकरमधून वायुगळती होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी खर्डी स्टेशन मास्तरांना कळवले. त्यांनी संबंधित यंत्रणेला कळवताच उरण येथून भारत पेट्रोलियमची तज्ज्ञ टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी पाच तासांनी वायुगळती बंद करण्यात यश मिळवले. यादरम्यान थोडीशी जरी ठिणगी पडली असती तरी मोठा अनर्थ झाला असता.


या घटनेविषयी माहिती मिळताच लागलीच रेल्वे सुरक्षा अधिकारी हनुमान सिंग, तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी, लोहमार्ग पोलीस अधिकारी शार्दूल, आपत्ती व्यवस्थापन टीम आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. वायुगळती सुरू असल्यामुळे वाहतूक सुरू राहिल्यास धोका निर्माण होऊ शकतो हे ओळखून आपत्ती व्यवस्थापन टीमने रेल्वे अधिकारी आणि तहसीलदारांना वाहतूक बंद करण्याविषयी विनंती केली. त्यानुसार दुपारी १२.३० वाजता वाहतूक बंद करण्यात आली.


तसेच रेल्वे पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीने गॅस टँकर लागतची घरे रिकामी करून सुरक्षेचा उपाय म्हणून रहिवाशांना इतरत्र हलवण्यात आले होते.
दरम्यान, वायुगळती सुरू असतानाही रेल्वे प्रशासनाने वाहतूक सुरू ठेवली होती. त्यामुळे चालू गाड्यांमधून एखादी ठिणगी उडाली असती तर मोठा अनर्थ घडला असता. वेळीच ही वायुगळती नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळल्याच प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी दिली. वायुगळतीमुळे परिसरात सर्वत्र उग्र वास पसरल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

वणवा पेटलेला असता तर मोठी दुर्घटना घडली असती
वायुगळती झालेल्या परिसरात रेल्वे रूळांजवळील डोंगर-टेकड्यांवर नेहमी वणव्याच्या घटना घडतात. आज जर वणवा पेटला असता तर मोठा अनर्थ घडून मोठी जीवित आणि वित्तहानी झाली असती.

Web Title: Exhaust from the tanker of the freight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.