धक्कादायक! जत्रेत मटण विक्रीसाठी आणलेले ६५ बकरे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 23:01 IST2022-05-11T22:59:41+5:302022-05-11T23:01:16+5:30
या बाबत मटण विक्रेते अब्दुल माबुद कुरेशी यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे

धक्कादायक! जत्रेत मटण विक्रीसाठी आणलेले ६५ बकरे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ
भिवंडी : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या जत्रा यात्रा उत्सव सुरू झाले असून प्रत्येक गावात या यात्रा जत्रा उत्सवा निमित्त कोंबडे बकरे मोठया प्रमाणावर कापले जातात. तालुक्यातील गुंदवली गावातील गावदेवीची जत्रा बुधवारी असल्याने गावातील मटण विक्रेता अब्दुल माबुद कुरेशी यांनी मंगळवारी कोनगाव बकरा मार्केट येथून ६ लाख रुपयांचे ५९ बकरे व १० मेंढे आणून रात्री आपल्या दुकाना शेजारी असलेल्या गाळ्यात चारापाणी देऊन बांधून ठेवले होते. सकाळी सहा वाजता त्यांचा मुलगा दुकानात आला, त्यावेळी त्याने गाळ्याचे शटर उघडले असता त्यामधील ६५ बकरे मृतावस्थेत आढळून आले. तर चार जिवंत राहिलेले बकरे सुध्दा मलूल होऊन पडल्याचे दिसले.
या बाबत मटण विक्रेते अब्दुल माबुद कुरेशी यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे .या बाबत तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ देवश्री जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन मृत बकरे शेलार येथील पशुचिकित्सलय या ठिकाणी शवविच्छेदना साठी आणले असून त्यांचे पृथकरण तपासून नक्की बकरे कशाने मृत झाले हे निष्पन्न होणार असल्याचे सांगत त्यानंतर सर्व मृत बकरे यांची शास्त्रोक्त पद्धतीने व्हिलेवाट लावण्या बाबत योग्य ते मार्गदर्शन केले जाणार असल्याचे डॉ देवश्री जोशी यांनी स्पष्ट केले .दरम्यान ऐन धंद्याच्या वेळी आशा पद्धतीने नुकसान झाल्याने सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आहे .तर पोलीस या बाबत कोणावर संशय आहे का त्या दिशेने तपास करीत आहेत.