मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज - अशोक शिनगारे
By सुरेश लोखंडे | Updated: February 27, 2023 17:35 IST2023-02-27T17:34:06+5:302023-02-27T17:35:09+5:30
ठाणे - आपल्या मराठी भाषेत ज्ञानाचा साठा आत्मसात करण्याची कुवत आहे. या भाषेचे संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन ...

मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज - अशोक शिनगारे
ठाणे - आपल्या मराठी भाषेत ज्ञानाचा साठा आत्मसात करण्याची कुवत आहे. या भाषेचे संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी शिनगारे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक व कवी रघुनाथ बापू देशमुख उपस्थित होते. तर उप जिल्हाधिकारी गोपिनाथ ठोंबरे, तहसिलदार राजाराम तवटे, नायब तहसीलदार स्मितल यादव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिनगारे म्हणाले की, सर्व शासकीय कामकाज मराठीमधून करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी आपण सर्वजण काम करत आहोत. कोणतेही ज्ञान हे आपल्या मायबोली भाषेतून समजून घेतले तर त्याचे आकलन लवकर होते. मराठी ग्रंथ संपदा एवढी मोठी आहे की, आपण ती शिकत मोठे झालो आहोत. आपण सर्वजण मराठी भाषा जागणारे व सवर्धन करणारे आहोत. आपले दैनंदिन कामकाज मराठी भाषेतून करण्याचे आवाहनही शिनगारे यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, आपली मराठी भाषा आपलेपणाने जपली पाहिजे. आपल्या मराठी भाषेचा विकास झाला पाहिजे. मराठी ही भाषा ज्ञान भाषा करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायाला पाहिजे. भाषा हा मानवाचा विकसनाचा प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे भाषा जिवंत ठेवणे गरजेचे आहे. मराठी ही अतिशय समृद्ध भाषा आहे. मराठी भाषेला संतांची, वैभवशाली परंपरा आहे, असेही त्यांनी उदाहरणादाखल स्पष्ट केले. यावेळी मराठी ग्रंथ संग्रहालय सुरू करण्यात आले. या फिरते ग्रंथालयाची पाहणी जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी केली.