ठाणे : घोडबंदर भागातील पानखंडा भागातील आदिवासी पाड्यावरील सुमारे दोन हजार नागरिकांना अद्याप शुद्ध पाणी मिळत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध करताच ठाणे महापालिकेच्या संबंधित विभागाचे धाबे दणाणले. दोन दिवसांत या भागाची पाहणी करून वनविभागाच्या सहकार्याने तोडगा काढला जाईल, असे आश्वासन पालिकेने दिले आहे. वनविभागाने जलवाहिनी टाकण्यास परवानगी दिली नाही तरी ती टाकली जाईल, अशी ग्वाही महापालिकेने दिली.
मागील कित्येक वर्षांपासून पानखंडा, देवाचा पाडा, बदानी पाडा येथील रहिवासी पाण्यासाठी तीन बोअरवेलवर अवलंबून आहेत. मात्र, त्याला गढूळ पाणी येत असून, त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. दोन वर्षांपासून महापालिकेने येथे जलवाहिनी टाकली, पण त्याला एक थेंबही पाणी येत नसल्याने येथील लोकांना डबक्यातील अशुद्ध पाणी प्यावे लागते. ठाण्यासारख्या प्रगत शहरातील या भीषण वास्तवाचे दर्शन घडवणारे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला.
ज्या शाळेजवळ जलवाहिनी पोहोचली आहे, तेथून ती पुढे नेण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून काम केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय या भागाची दोन दिवसांत पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले.
शाळेपासून जलवाहिनी पुढे नेण्याचे नियोजन करणार आहे. मात्र, वनविभागाचा अडसर असल्याने पुढे काम करता येत नव्हते. मात्र, आता वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून लवकर या भागाची पाण्याची समस्या सोडविली जाईल.- विनोद पवार, उपनगर अभियंता, पाणीपुरवठा विभाग