पावसाच्या उसंत नंतरही भिवंडीतील खड्डे जैसे थेच ; धुळीने नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 16:30 IST2021-10-04T16:30:31+5:302021-10-04T16:30:48+5:30
सोमवारी शासकीय निर्देशाने शाळा सुरु झाल्याअसल्याने चाकरमान्यांसह शाळेतील विद्यार्थ्यांना देखील या खड्डेमय रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाच्या उसंत नंतरही भिवंडीतील खड्डे जैसे थेच ; धुळीने नागरिक हैराण
नितिन पंडीत
भिवंडी भिवंडीतील रस्त्यांची सध्या दुरावस्था झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्ते व उड्डाणपुलांवरील रस्त्यांवर देखील प्रचंड खड्डे पडल्याने नागरिकांसह वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे रस्त्यांवर पडलेल्या या खड्ड्यांकडे भिवंडी मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने मनपा प्रशासना विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.
तर रस्त्यांवर पडलेले खड्डे पावसामुळे भरण्यास मनपा प्रशासनास अडचण येत असून पावसाने उसंत दिल्यास शहरातील खड्डे तत्काळ भरण्यात येतील असा कांगावा भिवंडी मनपा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी केला होता. मात्र मागील चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतली असतांनाही शहरातील रस्त्यांवर खड्डे जैसे थे असेच आहेत. त्यामुळे खड्डे तत्काळ भरण्याचा मनपा प्रशासनाचा दावा सध्यातरी फोल ठरला असल्याचे चित्र शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे पाहावयास मिळत आहे.
सोमवारी शासकीय निर्देशाने शाळा सुरु झाल्याअसल्याने चाकरमान्यांसह शाळेतील विद्यार्थ्यांना देखील या खड्डेमय रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच या खड्डेमय रस्त्यांवरून धूळ उडत असल्याने खड्ड्यांबरोबरच रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीने नागरिकांसह प्रवाशी हैराण झाले आहेत.